औरंगाबाद : महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाचे शनिवारपासून एकत्रीकरण करण्यात आले आहे. आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी त्याप्रकरणी आदेश काढले आहेत. पथकावर नजर ठेवण्यासाठी व त्यांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी एक वेगळी यंत्रणा यानिमित्ताने निर्माण करण्यात येणार आहे. सभापती विजय वाघचौरे यांनी याप्रकरणी प्रशासनाला गेल्या आठवड्यात आदेश दिले होते. लोकमतने २७ जुलै रोजी अतिक्रमण हटाव पथकाचा पालिकेतच मुक्काम असल्याचे वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे, सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधले होते. त्या अनुषंगाने सभापती वाघचौरे यांनी प्रभागनिहाय अतिक्रमण काढण्यासाठी गठीत करण्यात आलेले पथक रद्द करून एकत्रित जबाबदारी देण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, असे आदेश दिले होते. त्याची अंमलबजावणी उद्या ११ आॅगस्टपासून होत आहे. आयुक्त डॉ. कांबळे यांनी प्रभाग अभियंत्यांवर वॉर्डनिहाय अतिक्रमण काढण्यासाठी जबाबदारीचे विकेंद्रीकरण केले होते. मात्र, त्यांच्या उपक्रमाला मुजोर कर्मचाऱ्यांनी फाटा दिला. त्यामुळे अतिक्रमणांना अभय देण्याचे प्रकार वाढल्याने पुन्हा एकत्रीकरण करण्यात आले आहे. या पथकाची जबाबदारी पुन्हा शिवाजी झनझन यांच्याकडे देण्यात आली आहे. महापालिका अतिक्रमण पथकाला फक्त पोसत आहे. अतिक्रमण पथकांवर रोज एक ते दीड लाख रुपयांपर्यंत खर्च होतो. या पथकाची कार्यपूर्ती काय, कोणत्या भागात कारवाई करायची हे सगळे ठरवून दिलेले असताना इमारत क्र. ३ मध्येच ते पथक ठाण मांडून असते. त्यांच्या मदतीला देण्यात आलेले पोलीस पथकही अलबेल असून, मर्जीनुसार अतिक्रमण विभागाची मोहीम राबवितात. आदेश आला तरच पथक इमारत क्र. ३ च्या बाहेर पडते. हा विभाग गब्बर होत असून, पालिकेला कंगाल करीत आहे, तर शहरात अनधिकृत बांधकामे, हातगाड्यांना अभय देतो आहे.
अखेर अतिक्रमण विभागाचे एकत्रीकरण
By admin | Updated: August 11, 2014 01:57 IST