उस्मानाबाद : शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी ११ सप्टेंबर रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या हस्ते जिल्ह्यातील एक हजार शेतकरी कुटुंबियांना शिवसेनेच्या वतीने आर्थिक मदत देण्यात येणार आहे. शुक्रवारी सकाळी दहा वाजता ठाकरे यांचे येथे आगमन होणार असून, विश्रामगृहावर आल्यानंतर तेथून ते शिवसेनेच्या वतीने सुरू करण्यात आलेली चारा छावणीची पाहणी करण्यासाठी जाणार आहेत. यानंतर हातलाई मंगल कार्यालयात शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन व शेतकरी कुटुंबिायांना मदतीचे वाटपही केले जाणार आहे. याच कार्यक्रमात पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते विशेष घटक योजनेअंतर्गत गरजू लाभार्थ्यांना गायी, म्हशी व शेळ्यांचे वाटप, बाळासाहेब ठाकरे दत्तक पाल्य योजनेअंतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पहिली ते बारावीपर्यंत शिकणाऱ्या ४७ पाल्यांना दत्तक घेण्यात येणार आहे. यावेळी ठाकरे यांच्या समवेत पालकमंत्री डॉ. सावंत, रामदास कदम, परिवहन मंत्री दिवाकर रावते, बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, बांधकाम राज्यमंत्री विजय शिवतारे, दादासाहेब भुसे, रविंद्र वायकर, दीपक केसकर, संजय राठोड, शिवसेना सचिव खा. अनिल देसाई, उपनेते खा. चंद्रकांत खैरे, लक्ष्मण वडले, खा. प्रा. रवींद्र गायकवाड तसेच शिवसेनेचे इतर खासदार, आमदार व वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती जिल्हा प्रमुख सुधीर पाटील यांनी दिली.
उध्दव ठाकरे शुक्रवारी जिल्ह्यात
By admin | Updated: September 10, 2015 00:30 IST