औरंगाबाद : शहरात मंगळसूत्र चोरटे पुन्हा सक्रिय झाले असून मुकुंदवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी दोन मंगळसूत्र मोटारसायकलस्वार चोरट्यांनी तोडून नेले. या घटनेमुळे महिलांमध्ये पुन्हा दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे, अशा प्रकारे दोन दिवसांत मंगळसूत्र चोरीच्या तीन घटना घडल्या आहेत.स्वप्ननगरी येथील रहिवासी स्वप्ना रिपाल जांगीड (३०) या आपल्या घरापासून काही अंतरावर वॉकिंगसाठी गेल्या होत्या. समोरून आलेली एक मोटारसायकल अचानक त्यांच्याजवळ येऊन थांबली. मोटारसायकलवर मागे बसलेल्या तरुणाने त्यांच्या गळ्यातील अडीच तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून घेतले. त्यानंतर ते चोरटे धूमस्टाईलने निघून गेले. त्यांनी आरडाओरडी केली. मात्र, तोपर्यंत चोरटे पसार झाले. ही घटना सायंकाळी साडेसहा ते पावणेसात वाजेच्या दरम्यान घडली. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे. दुसरी घटना सायंकाळी सात वाजेच्या सुमारास सिडको एन-४ येथे घडली. एन-४ येथील रहिवासी महिला रात्री पायी जात असताना मोपेडस्वार दोन चोरट्यांनी आठ तोळ्यांचे मंगळसूत्र लांबविले. सदर महिलेने रात्री उशिरापर्यंत पोलिसांत तक्रार नोंदविली नव्हती. या घटनेची माहिती मुकुंदवाडी पोलिसांना मिळताच त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला या घटनेची माहिती कळवून तातडीने नाकाबंदी सुरू केली. ४रविवारी जालना रोडवरील सेव्हन हिल उड्डाणपुलाखाली एका महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्याचे मंगळसूत्र चोरट्याने हिसकावून नेले होते. त्या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली होती.
दोन महिलांचे मंगळसूत्र हिसकावले
By admin | Updated: December 2, 2014 01:09 IST