लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : दोन दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी चक्क एका जणाच्या दोन दुचाकी पेटवून दिल्यानंतर पळून जाणाºया तरुणाला अवघ्या तासाभरात बेगमपुरा पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली. ही घटना बिस्मिल्ला कॉलनीत १० आॅगस्ट रोजी रात्री दीड ते दोन वाजेच्या सुमारास घडली.मोहंमद उमर फारुख मोहंमद आरे (१९, रा. बिस्मिल्ला कॉलनी) असे आरोपीचे नाव आहे. याविषयी पोलिसांनी सांगितले की, बिस्मिल्ला कॉलनीत राहणारे मोहंमद सत्तार मोहंमद इस्तीहार हे १० आॅगस्ट रोजी रात्री नेहमीप्रमाणे त्यांच्या कुटुंबियासह झोपले. रात्री दीड वाजेच्या सुमारास अचानक त्यांच्या घरासमोर उभ्या दोन मोटारसायकली अज्ञाताने पेटवून दिल्या. त्यामुळे उडालेला भडका आणि धुराने तक्रारदार यांच्या कुटुंबियास जाग आली. यावेळी त्यांनी आरडाओरड केल्याने शेजारील लोक मदतीला धावले आणि त्यांनी पेटलेल्या दुचाकींवर पाण्याचा मारा करून आग विझविली. बेगमपुरा ठाण्याचे निरीक्षक वसीम हाश्मी हे गस्तीवर होते. त्यांना या घटनेची माहिती मिळताच ते तात्काळ घटनास्थळी पोहोचले. यावेळी त्यांनी तक्रारदार यांची चौकशी केली. तेव्हा दोन दिवसांपूर्वी त्यांच्या मुलाचे कॉलनीतील दुसºया एका मुलासोबत भांडण झाले होते. तो या मागे असण्याची शक्यता वर्तविली. यानंतर त्यांनी घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही कॅमेºयांच्या माध्यमातून वाहने जाळण्याची घटना नेमकी कशी घडली, हे पाहिले. तेव्हा त्यांना एक तरुण दोन्ही दुचाकींना पेटविल्यांनतर गल्लीतून पळून गेल्याचे दिसले. सीसीटीव्हीतील फुटेजवरून तक्रारदार यांनी उपस्थित केलेली शंका खरी ठरली. दोन्ही दुचाकी पेटवून देताना आरोपी मोहंमद उमर फारुख हा सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाला. त्याची ओळख पटल्याने पोलिसांनी लगेच त्यास ताब्यात घेतले.
जुन्या वादातून दोन दुचाकी पेटविल्या, संशयिताला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 00:28 IST