उस्मानाबाद : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह सर्वांनाच आपल्याकडे दुचाकी, चारचाकी वाहन असावे, असे वाटते. एकिकडे इंधनाच्या किंमती वाढलेल्या असल्या तरी त्यामुळे वाहन खरेदीला ब्रेक बसलेला नाही. मागील वर्षात जिल्ह्यात तब्बल १ लाख ५१ हजार ८४५ सर्व प्रकारच्या वाहनांची संख्या वाढली असून, ही वाढ २०१२ च्या तुलनेत शेकडा १५.७६ टक्के एवढी आहे. विशेष म्हणजे सरत्या वर्षात बसगाड्यांची संख्याही २.४८ टक्क्यांनी वाढली असून, यामुळे प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला आहे. चारचाकी आणि ती घेता येत नसेल तर किमान दुचाकी तरी आपल्याकडे असावी, असे प्रत्येकाचेच स्वप्न असते. मागील काही वर्षात वाहन कर्ज पुरवठा करणाऱ्या वित्तीय संस्थांची संख्याही वाढली असून, सहजपणे कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी या संस्था प्रयत्नरत असतात. त्यातच वेतन आयोगाची ठराविक अंतराने भर पडत असल्याने अनेकांसाठी चारचाकीचे स्वप्न कवेत आले आहे. त्यामुळेच मागील काही वर्षात जिल्ह्यात दुचाकी-चारचाकीसह इतर मालवाहतूक वाहनांची संख्याही सुसाट वाढत आहे. सर्वात वेगाने दुचाकी वाहनांची संख्या वाढत आहे. अनेक घरांत तर प्रत्येक माणसांगणिक एक दुचाकी असे चित्र निर्माण झाले आहे. आजघडीला १ लाख ३ हजार ३६९ पेक्षा अधिक दुचाकी वाहने असून, मागील वर्षी यामध्ये १४.०४ टक् क्यांनी वाढ झाली आहे. दुचाकीप्रमाणेच चारचाकी वाहनांची संख्याही वाढत आहे. मागील वर्षी १२.३६ टक्क्यांनी चारचाकी वाहने वाढली असून, यामध्येही डिझेलवर चालणाऱ्या वाहनांची संख्या मोठी असल्याचे प्रादेशिक परिवहन विभागाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीवरून दिसते. (जि.प्र.)
दुचाकी, चारचाकी सुसाट !
By admin | Updated: October 23, 2014 00:15 IST