अंभई : सिल्लोड तालुक्यातील पांगरी येथील वस्तीत अनेक रुग्ण डेंग्यूसदृश तापाने फणफणले असून, आतापर्यंत दोन जणांचा या आजाराने मृत्यू झाल्याने गावात घबराट पसरली आहे. गावातील अनेक रुग्णांनी उपचारासाठी शहरांकडे धाव घेतली आहे. पांगरी येथील यादव लक्ष्मण शिंदे (६०) यांचा खाजगी रुग्णालयात उपचार घेऊन घरी आल्यानंतर काल मृत्यू झाला, तर सुमनबाई जगन वेलदोडे (४५) यांचा आज घाटी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांचे पूर्ण घर तापाने फणफणले आहे. अन्य एक रुग्ण सुनीताबाई मधुकर शिंदे यांच्यावर जालना येथील रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती गावकरी तातेराव सोन्ने, जगदीश सोन्ने यांनी दिली. या वस्तीत मोठ्या प्रमाणावर डासांचा प्रादुर्भाव झाला आहे. या वस्तीत पिण्याचे पाणी येत नाही. पिण्याच्या पाण्याची समस्या असल्याने या वस्तीत खोल खड्डे केलेले दोन नळ आहेत. या खड्ड्यात पाणी साचून राहते. दरम्यान, या नळाला पिण्यायोग्य पाणी येत नसल्याचे वस्तीतील रमेश भिवसने व रहिवाशांनी सांगितले. दरम्यान, आरोग्यसेवकांचे एक पथक शनिवारी सकाळी गावात दाखल झाले आहे. घटांब्री आरोग्य उपकेंद्रांतर्गत हे गाव येते. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. पी. महेर हे गावातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेऊन दिलासा द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
‘डेंग्यू’चे दोन बळी
By admin | Updated: October 16, 2016 01:16 IST