औरंगाबाद : हजार व पाचशेच्या जुन्या नोटाबंदी नंतर चलनात आलेली २ हजार रुपयांची नोट आता दुर्मिळ झाली आहे. ही नोट चलनात आहे पण बाजारातून गायब झाली आहे.
दोन हजार रुपयांची गुलाबी नोट तीन वर्षांपूर्वी बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध होती. मात्र, हळूहळू या नोटा व्यवहारातून गायब होत आहेत. बाजारात फेरफटका मारला तर खूप कमी प्रमाणात २ हजाराची नोट आढळून येत आहे. एका पेट्रोलपंप चालकाने सांगितले की, आमचा पंपावर दररोज ५ लाखांची उलाढाल होत असते. त्यात २ हजारांच्या फक्त ५ ते ६ नोटा असतात. मोंढ्यातील किराणा होलसेल व्यापाऱ्यांनी सांगितले की, ५०० रुपये, २०० रुपये, १०० रुपये, २० व १० रुपयांच्या नोटा दैनंदिन व्यवहारात जास्त प्रमाणात येत आहे. मात्र, २ हजारांच्या नोटेचे प्रमाण तुरळक झाले आहे. आठवडाभरानंतर एखाद्याच २ हजारांच्या नोटेचे दर्शन होते, असेही काही व्यापाऱ्यांनी सांगितले.
बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, मागील ९ महिन्यापासून रिझर्व्ह बँकेने २ हजार रुपयांच्या नोटा पाठवल्या नाहीत. यामुळे एटीएमद्वारेही त्या नोटा दिल्या जात नाहीत. तसेच रिझर्व्ह बँकेने या नोटा छपाई बंद केली आहे. मात्र, याचा अर्थ असा नाही की २ हजारच्या नोटा व्यवहारातून बाद झाल्या आहेत. दैनंदिन व्यवहारात या नोटा आजही स्वीकारल्या जात आहेत.
चौकट
नोटा साठविल्याचा संशय
२ हजार रुपयांच्या नोटा बाळगण्यास सोप्या जातात. यामुळे या मोठ्या नोटाचा मोठ्या प्रमाणात साठा ( डंप) केल्या जात असल्याचा संशय व्यापारी व्यक्त करत आहे.