औरंगाबाद : शहराच्या विविध भागांतून दुचाकी पळविणाऱ्या दोन चोरट्यांना मुकुंदवाडी पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून दोन लाख २० हजार रुपयांच्या आठ दुचाकी जप्त केल्या. ही कारवाई रविवारी करण्यात आली.संकेत खांडेकर (१९) आणि संदीप ऊर्फ शिवाजी जाधव (१९, दोघे रा. आशानगर, गारखेडा) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. याबाबत मुकुंदवाडी ठाण्याचे पोलीस निरीक्षक नाथा जाधव यांनी सांगितले की, गुन्हे शोध पथकाला दुचाकी चोरट्यांबाबत गुप्त माहिती मिळाली होती. त्यावरून फौजदार कल्याण शेळके, पोहेकॉ. कौतिक गोरे, पोकॉ. कैलास काकड, विष्णू हागवणे, विजय चौधरी, प्रकाश सोनवणे या पथकाने चोरट्यांना राहत्या घरून उचलले. त्यांना ठाण्यात विचारपूस केली असता दोघांनीही चोरीची कबुली दिली. सातारा, उस्मानपुरा, जवाहरनगर, सिडको आणि मुकुंदवाडी ठाण्यांच्या हद्दीतून चोरलेल्या आठ दुचाकी त्यांच्या ताब्यातून जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे, सहायक पोलीस आयुक्त सुदर्शन मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.जप्त केलेल्या दुचाकी : जप्त केलेल्या दुचाकींचा क्रमांक पुढीलप्रमाणे : एमएच २० बीजे १५३२, एमएच २० बीपी ९२२५, एमएच २० ए ९१०४, एमएच १६ एएन ५९६, एमएच २० बीझेड ५१६७, एमएच २८ जे ४१३९, एमएच १२ एव्ही ५६२४, एमएच २१ एएफ १२००.
आठ दुचाकींसह दोन चोरांंना अटक
By admin | Updated: March 22, 2016 01:30 IST