लातूर : बिनविरोधी ग्रामपंचायत सदस्य निवडीची परंपरा असलेल्या बाभळगावला यावेळी निवडणूक झाली. १५ पैकी ७ जागा बिनविरोध आल्यावर ८ जागांसाठी मतदान झाले. माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या नेतृत्वात झालेल्या या निवडणुकीत विरोधकांच्या दोन सदस्यांना गुलाल लागला. तर दुसरीकडे कव्हा येथे माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या नेतृत्वात ११ पैकी १० जागा बिनविरोध आल्या. एका जागेसाठी झालेल्या निवडणुकीत विरोधी गटाच्या उमेदवाराने कव्हेकरांना अस्मान दाखविले.विलासराव देशमुख यांच्या बाभळगावात ग्रामपंचायत निवडीसाठी बिनविरोधची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून कायम होती. मात्र विलासराव देशमुख यांच्यानंतर पहिल्यांदाच झालेल्या निवडणुकीत आमदार अमित देशमुख यांनी बिनविरोधची परंपरा कायम टिकविण्यासाठी प्रयत्न केला असता त्यात त्यांना फारसे यश आले नाही. १५ पैकी ७ जागा बिनविरोध काढल्या. ८ जागांसाठी देशमुख पॅनलविरुद्ध विरोधकांनी निवडणूक लढविली. यात ६ जागा देशमुख गटाने जिंकल्या, तर दोन जागांवर विरोधकांचा विजय झाला आहे. प्रभाग क्र. २ हा गढीचा प्रभाग. याच प्रभागात देशमुख कुटुंबियांचे मतदान आहे. कसोशीचे प्रयत्न करूनही याच प्रभागातून देशमुख गटाला हार पत्करावी लागली आहे. अपक्ष म्हणून निवडणूक लढविलेल्या राधाबाई थडकर (४३१ मते) यांनी देशमुख गटाच्या उमेदवाराचा पराभव केला. बाभळगावात विरोधकांच्या पॅनलची परिसरात चर्चा होती. मात्र दोनच जागांवर त्यांना विजय मिळविता आला. (प्रतिनिधी)
बाभळगावात दोन विरोधी सदस्यांना गुलाल
By admin | Updated: April 24, 2015 00:37 IST