उस्मानाबाद : वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून दंड भरण्याचा जणू छंदच उस्मानाबादकरांना लागला आहे़ शहरासह ग्रामीण भागातील चालक वाहतुकीचे नियम मोडत महिनाकाठी सरासरी तब्बल दोन लाख रूपयांचा दंड भरतात़ वाहतूक शाखेने चालू वर्षी आठ महिन्यांत नियम मोडणाऱ्या तब्बल १४ हजार ५२ चालकांविरूध्द कारवाई करून १६ लाख ७३ हजार २०० रूपयांचा दंड वसूल केला आहे़शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी, यासाठी शहरात पाच ठिकाणी सिग्नल बसविण्यात आले आहेत़ मात्र, सिग्नल मोडण्यासह अवैध प्रवाशी वाहतूक, फॅन्सी नंबर, पार्किंग, त्रिटपल शिट आदी वाहतुकीचे विविध नियम डावलून वाहने चालविण्यात उस्मानाबादकरांनी यंदा आघाडी घेतली आहे़ अशा मुजोर वाहनचालकांवर वाहतूक शाखेने कारवाईचा बडगा कायम ठेवला आहे़ वारंवार कारवाई होत असली तरी नियम मोडण्याची लागलेली सवय कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत़ विशेषत: युवक वर्गांकडून नियमांचे अधिकाधिक उल्लंघन होत असल्याचे दिसून आले आहे़ वाहतूक शाखेने चालू वर्षी जानेवारी महिन्यात तब्बल २४१४ केसेस करून २ लाख ४५ हजार ८०० रूपयांचा दंड, फेब्रुवारी महिन्यात २३०४ केसेस करून २ लाख ३५ हजार ७०० रूपये, मार्च महिन्यात १४८० केसेस करून १ लाख ५० हजार ४०० रूपये, एप्रिल महिन्यात ९४६ केसेस करून १ लाख ४२ हजार ५०० रूपये, मे महिन्यात १९५६ केसेस करून २ लाख ६१ हजार रूपये, जून महिन्यात ११३४ केसेस करून २ लाख ११ हजार रूपये, जुलै महिन्यात १९८८ केसेस करून २ लाख २८ हजार ९०० रूपयांचा तर आॅगस्ट महिन्यात १८३० केसेस करून १ लाख ९७ हजार ९०० रूपयांचा दंड वसूल केला आहे़ सप्टेंबर महिन्यातही कारवाईची धडक मोहीम सुरू असल्याचे वाहतूक शाखेकडून सांगण्यात आले. (वार्ताहर)शहर पोलिस ठाण्यानजीकच वाहतूक शाखेचे कार्यालय आहे़ या कार्यालयानजीक असलेल्या संत गाडगेबाबा चौकात वाहतूक सिग्नल बसविण्यात आले आहे़ मात्र, येथे कर्तव्यावर राहणारे काही पोलिस कर्मचारी अनेकवेळा सिग्नलवर न थांबता कार्यालयानजीक थांबत आहेत़ पोलिस नसल्याचे पाहून सिग्नल मोडून पुढे आलेल्या चालकाला थांबवून गनिमीकाव्याने दंड वसूल करण्यात येत आहे़ सिग्नलवर कर्मचारी थांबणे अपेक्षित असताना कार्यालयानजीक होणारी गनिमीकाव्याची कारवाई ही आर्थिक लूट असल्याचा आरोप चालकांमधून होत असून, हा प्रकार थांबविण्याची मागणी होत आहे़
महिन्याकाठी चालकांना होतो दोन लाखाचा दंड!
By admin | Updated: September 17, 2014 01:12 IST