धारुर : चार तास जोरदार पाऊस झाल्याने नदीला आलेल्या पूराचे पाणी कुक्कुट पालन शेडमध्ये शिरले आणि पाण्यात बुडून दोनशे कोंबडीची पिले मृत्यूमुखी पडल्याची घटना तालुक्यातील भोगलवाडी येथे घडली. गुरूवारी मध्यरात्री धारूर परिसरात जोरदार पाऊस झाला. भोगलवाडी येथील नदीला या पावसाने पूर आला. येथील शेतकरी अर्जुन सोपान मुंडे यांचे नदीलगतच शेत असून याठिकाणी त्यांचे कुक्कुटपालनचे शेड आहे. या शेडमध्ये हे पाणी शिरल्यामुळे शेडमध्ये असलेली दोनशे कोंबडीची पिले या पाण्यात बुडून मेली. नदीच्या काठावरच असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची भिंतही या पाण्यात वाहून गेली. त्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. मुंडे यांनी मोठ्या मुश्किलीने शेड उभारले होते. पावसाने ते हिरावले. नुकसान भरपाई देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. (वार्ताहर)
कोंबड्यांची दोनशे पिले पुरात मृत्यूमुखी
By admin | Updated: July 23, 2016 01:05 IST