औरंगाबाद : शिवाजीनगर वॉर्ड क्र.११२ वरून शिवसेनेत दोन गट आज आमने-सामने येण्याची वेळ आली. नेत्यांच्या मध्यस्थीमुळे कुठलाही वाद झाला नसला तरी त्या वॉर्डाची उमेदवारी आता प्रतिष्ठेचा मुद्दा होणार आहे. समर्थनगर प्रचार कार्यालयात पश्चिम मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखतींचे सत्र सुरू असताना हा प्रकार घडला. आ.संजय शिरसाट समर्थक सुशील खेडकर आणि महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल समर्थक राजेंद्र जंजाळ यांच्यासह माजी नगरसेवक विनोद सोनवणे, साईनाथ वेताळ यांना त्या वॉर्डातून उमेदवारी हवी आहे. परंतु जंजाळ आणि खेडकर यांच्यापैकी एकाला तेथून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. वॉर्ड सोडतीमध्ये शिवाजीनगर खुल्या प्रवर्गासाठी सुटलेला आहे. त्यामुळे तेथून खुल्या प्रवर्गातील पदाधिकाऱ्याचा विचार व्हावा, अशी एका गटाची मागणी आहे. उमेदवारीसाठी सुमारे २० ते २५ जण संपर्क नेते विनोद घोसाळकर, आ.संजय शिरसाट, माजी आ. संतोष सांबरे, सुहास दाशरथे यांच्या पॅनलसमोर मुलाखत देण्यासाठी गेले. मुलाखती सुरू असताना अचानक जातीवरून वाद झाल्याने दोन गट आमने-सामने आले. वाद विकोपाला जाऊ नये यासाठी नेत्यांनी सर्वांना बाहेर काढून एकत्रितपणे ठरवून उमेदवारी मागा असे सांगितले. त्यानंतर सर्व जण बाहेर पडले. जंजाळ आणि खेडकर समर्थक आपापसात संतापून चर्चा करीत होते. कोण कोणत्या जातीचा आहे, यावरूनच नेत्यांसमोर वाद झाल्यामुळे मुलाखतीचे सत्र अर्धवट राहिले. शिवाजीनगरमध्ये स्थानिकाला उमेदवारी द्यावी, अशी मागणी जोर धरीत आहे. मुळात सर्व जण स्थानिक असताना हा वाद जन्माला कुठून आला हे कळण्यास मार्ग नाही.
शिवाजीनगरवरून सेनेत थेट दोन गट
By admin | Updated: March 28, 2015 00:48 IST