बाऱ्हाळी: येथून जवळच असलेल्या मौजे जिरगा येथे स्वस्त धान्य वाटपावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. यात सात किरकोळ तर चार गंभीर जखमी झाले आहेत़मौजे जिरगा येथील स्वस्त धान्य दुकान गत काही वर्षांपासून चर्चेचा ठरत आले. गावात पूर्वी दोन स्वस्त धान्य दुकान होती़ परंतु मोठ्या प्रमाणात अफरातफर झाल्याचे सिद्ध झाल्याने ती रद्द करण्यात येवून जिरगा येथील स्वस्त धान्य वाटप अन्य गावातील दुकानदारास देण्यात आले होते़ त्यामुळे धान्य वाटपावरून नेहमीच दोन गटांत वाद होत असत़ २० जुलै रोजी धान्य वाटप चालू असताना दुपारी गावातीलच एका गटाने धान्य वाटप बंद करण्याचा आग्रह धरला़ परंतु विरोधी गटाने त्यास विरोध केल्याने दोन्ही गटांत बाचाबाची झाली़ त्याचे पर्यावसन भांडणात झाले़ दोन्ही गटाकडून कुऱ्हाड, कत्ती, लोखंडी सळई याचा मुक्त वापर करण्यात आला़ यात चार जण गंभीर जखमी झाले. सात जणांना किरकोळ मार लागला़ चारपैकी एकाची स्थिती अत्यवस्थ असल्याचे समजते़ गंभीर जखमींपैकी अनिल वैजनाथ तरगुडे (वय २२) याची स्थिती नाजूक आहे़ जखमींना पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले आहे़ नारायण लक्ष्मण बाजगीरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि दिलीप तिडके, पोलिस जमादार मोरे करीत आहेत़ (वार्ताहर)
दोन गटांत तुंबळ हाणामारी; ७ जखमी
By admin | Updated: July 23, 2014 00:22 IST