औरंगाबाद : भरधाव जाणाऱ्या खाजगी बस (ट्रॅव्हल्स)ने बाबा पेट्रोल पंप चौकात एका मोटारसायकलस्वाराला चिरडले. या अपघातात हा तरुण जागीच ठार झाला. ही हृदयद्रावक घटना आज रात्री ८.४५ वा. घडली. घटनेबाबत पोलिसांनी सांगितले की, धारीवाल ट्रॅव्हल्सची खाजगी प्रवासी बस क्रमांक (एमएच-४१ टी-११९९) आज रात्री औरंगाबादहून इंदौरला जात होती. ती ८.३० वा. सिडको बसस्टँडहून प्रवासी बसवून अदालत रोडवरील मनमंदिर ट्रॅव्हल्स पिकअप पॉइंटकडे जात असताना वळण घेताना रत्नप्रभा मोटार्ससमोर (एमएच-२१, एफ-९९६७) या क्रमांकाच्या एलएमएल फ्रीडमवर असलेला मोटारसायकलस्वार युवक दुभाजकच्या बाजूने पुढे जात होता. बसने त्याला मागून जोरात धडक दिली. त्यामुळे मोटारसायकलीसह तो रोडवर पडला अन् मागील चाक त्याच्या डोक्यावरून गेल्याने घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला. दुर्घटना पाहून इतर वाहनचालकांनी जोरदार आरडाओरडा केला. यावेळी त्याने बस जागेवर न थांबविता मनमंदिर ट्रॅव्हल्सवर आणून थांबविली आणि तेथून पोबारा केला. अपघाताची माहिती कळताच उस्मानपुरा पोलिसांनी मृतदेह घाटीत जमा केला. रात्री उशिरापर्यंत मयत युवकाचे नाव कळाले नव्हते. क्रांतीचौक पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.
ट्रॅव्हल्सखाली चिरडून दुचाकीस्वार ठार
By admin | Updated: November 7, 2014 00:51 IST