सेलू : तालुक्यातील तुळजा भवानी खाजगी साखर कारखान्याच्या उभारणीचे काम वेगाने सुरू आहे़ यावर्षी चाचणी हंगाम घेण्यासाठी चार महिन्यांचा अवधी लागणार असल्याची माहिती आ़ रामप्रसाद बोर्डीकर यांनी दिली़ आडगाव दराडे परिसरात तुळजा भवानी साखर कारखान्याचे काम प्रगतीपथावर आहे़ कारखाना सुरू करण्यासाठी अनेक अडचणी आल्या़ परंतु, आता कुठलीही अडचण राहिली नाही़ त्यामुळे चार महिन्यांत कारखान्याचा चाचणी गळीत हंगाम सुरू करण्यासाठी दिवसरात्र काम सुरू आहे़ पहिल्या वर्षी अडीच हजार मे़ टन ऊस गाळपाची क्षमता आहे़ टप्प्या- टप्प्याने ५ हजार मे़ टनापर्यंत ऊस गाळप करण्याचा संकल्प आहे़ त्या दृष्टीनेच कारखाना उभारताना यंत्रसामग्री बसविण्यात येत आहे़ या कारखान्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासोबतच सुशिक्षित बेरोजगार व कुशल कामगारांना रोजगाराची संधी मिळणार आहे़ बॉयलर, ७२ मीटर चिमणी तसेच गव्हाणी आणि टर्मिनलचे कामे सुरू आहेत़ कारखाना कार्यक्षेत्रातील जवळपास ५०० शेतकऱ्यांना ऊसलागवड करण्यासाठी बेणे उपलब्ध करून देण्यात आले आहे़ तुळजा भवानी साखर कारखाना सुरू झाल्यानंतर परिसरातील ग्रामस्थांनाही छोटे- मोठे व्यवसाय सुरू करण्यास मदत होणार आहे़ येत्या चार महिन्यांत कारखान्याचा चाचणी गळीत हंगाम करण्याचा मनोदय आ़ बोर्डीकरांनी व्यक्त केला़ यावेळी आ़ बोर्डीकर मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर पाटील वाघीकर, सुनील भोंबे, अभियंता गंगाधर आडळकर, सरपंच मधुकर काकडे, मिलिंद पवार, दत्ता महाराज मगर आदी उपस्थित होते़
तुळजाभवानी कारखान्याची चाचणी
By admin | Updated: July 27, 2014 01:10 IST