बाळासाहेब जाधव , लातूरनिवडणूक विभागाच्या मागणीनुसार विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत एस.टी. महामंडळाच्या वतीने निवडणूक विभागाच्या मागणीनुसार मतदान यंत्र व कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी १५५ गाड्यांची सोय केली होती. या प्रवासापोटी एस.टी. महामंडळाला मिळणाऱ्या एकूण उत्पन्नापैकी अडीच लाख रुपये बजेटअभावी थकले आहेत. परिणामी, एस.टी. महामंडळाच्या विभागीय कार्यालयाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ या ब्रीदवाक्यानुसार सेवा देणाऱ्या एस.टी. महामंडळाच्या वतीने निवडणूक विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या सहा मतदारसंघाअंतर्गत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांशी करार करून जिल्ह्यातील मतदान केंद्रांसाठी १५५ बसेसची सोय करण्यात आली होती. एस.टी. महामंडळाच्या वतीने मतदान केंद्रावर नेण्यात येणाऱ्या केंद्राध्यक्ष व मतदान यंत्राची ने-आण करण्यासाठी बसच्या सोयीसह त्या-त्या मतदारसंघातील बसेसवर नियंत्रण ठेवण्यासाठी संपर्क अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली होती. या बसेसच्या माध्यमातून एस.टी. महामंडळाला ३९ लाख १४ हजार रुपयांचे उत्पन्न द्यावे, अशी मागणी निवडणूक विभागाकडे करण्यात आली होती. यापैकी लातूर शहर मतदारसंघातील चार बसेसच्या माध्यमातून मिळणाऱ्या १ लाख ५ हजार ७९० रुपयांपैकी १ लाख रुपये जमा करण्यात आले. तर उर्वरित ५ हजार ७९० रुपये बजेटअभावी रखडले आहे. लातूर ग्रामीण मतदारसंघासाठी लावण्यात आलेल्या ३७ बसेसच्या माध्यमातून ९ लाख ७८ हजार ५५४ रुपये उत्पन्नापैकी ८ लाख २० हजार रुपये जमा करण्यात आले. तर १ लाख ५८ हजार ५५४ रुपये रखडले आहेत. अहमदपूर विधानसभा मतदारसंघासाठी लावण्यात आलेल्या ३२ बसेसच्या माध्यमातून ५ लाख ६४ हजार १६० रुपयांपैकी ४ लाख ६५ हजार ४४० रुपये जमा करण्यात आले असून, ९८ हजार ७२० रुपये अद्यापही रखडले आहेत. तर उदगीर मतदारसंघासाठी १६ बसेसच्या माध्यमातून ३ लाख १० हजार ४०० रुपये जमा करण्यात आले. निलंगा मतदारसंघातून ३३ बसेसपोटी ८ लाख रुपये जमा करण्यात आले. तर औसा विधानसभा मतदारसंघातील २९ बसेसच्या माध्यमातून ५ लाख ११ हजार २८७ रुपये जमा करण्यात आले आहेत. तर उर्वरित तीन विधानसभा मतदारसंघातील २ लाख ६२ हजार १४४ रुपये अद्यापही थकित राहिल्याने एस.टी. महामंडळाच्या विभागीय कार्यालयाला अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे.
एस.टी.चे अडीच लाख थकले !
By admin | Updated: October 23, 2014 00:16 IST