लातूर : लिंगायत समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करू. शिवाय, स्वतंत्र धर्माचा दर्जा मिळवून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठपुरावा करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केले.लातूर येथे राज्यस्तरीय बसव महामेळाव्यात ते बोलत होते. मंचावर खासदार डॉ. सुनील गायकवाड, शांतवीरलिंग शिवाचार्य महाराज, शंभूलिंग शिवाचार्य महाराज, उद्योजक शंकरराव बोरकर, प्रा.बी.व्ही. मोतीपवळे, ए.सी. पाटील, डी.बी.लोहारे गुरुजी, हरिहरराव भोसीकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व्यंकट बेद्रे, जि.प.चे उपाध्यक्ष अण्णासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून मेळाव्याचे उद्घाटन झाले. त्यानंतर जीवन गौरव व समाजभूषण पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी जानकर म्हणाले, राज्यातील ३८ विधानसभा मतदारसंघांत लिंगायत समाजाचे वर्चस्व आहे. समाजाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रयत्न करीन. महात्मा बसवेश्वरांच्या नावाने एक रिसर्च सेंटर सुरू होणे गरजेचे आहे. तसेच महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी समाजातून आली आहे. मात्र सध्या सुरू असलेल्या महामंडळाची अवस्था पाहता राष्ट्रीयकृत बँकेच्या माध्यमातून उद्योग, व्यवसायासाठी कर्जाची तरतूद करता येईल का, याविषयी विचारविनिमय होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. खा.डॉ. सुनील गायकवाड म्हणाले, लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्यासाठी येत्या अधिवेशनात प्रश्न मांडणार आहे. त्याचबरोबर आरक्षणासाठीही राज्य सरकारकडे पाठपुरावा करू. शिवाय, नळेगाव साखर कारखाना सुरू करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाशी चर्चा केली जाईल. राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर यांच्या मध्यस्थीने तो साखर कारखाना सुरू करण्याचा प्रयत्न केला जाईल.काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. बेद्रे म्हणाले, इतर समाजाला सोबत घेऊन चालण्याची परंपरा महात्मा बसवेश्वरांनी सुरू केली. ती परंपरा जोपासली पाहिजे. उदगीरचे शिवलिंग शिवाचार्य महाराज म्हणाले, इष्टलिंग पूजा महत्वाची आहे. मन:शांती व सुख, समाधान आदी गोष्टी मिळविण्यासाठी प्रत्येकाने पूजा करणे गरजेचे आहे. शांतवीरलिंग शिवाचार्य महाराज म्हणाले, बसव महामेळावा हा आरक्षणासाठीच घेतला आहे. प्रा. सुदर्शन बिरादार यांनी नि:स्वार्थपणे आरक्षणासाठी लढा सुरू केला आहे. समाजाने खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. प्रास्ताविक संयोजक प्रा. सुदर्शन बिरादार यांनी केले. (प्रतिनिधी)
आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार
By admin | Updated: December 29, 2014 00:57 IST