केदारखेडा : जालना - भोकरदन मुख्य मार्गावर असलेल्या एचडीएफसी बँकेचे शटर तोडून चोरट्यांनी चोरीचा अयशस्वी प्रयत्न केला. ही घटना ५ मे रोजी रात्री घडली. या प्रकारामुळे खळबळ उडाली असून पोलिसांनी घटनास्थळी पाचारण केलेले श्वानपथक जागेवरच फिरल्याने चोरट्यांचा माग लागला नाही. मुख्य रस्त्यापासून अवघ्या ५० फुटावर असलेल्या एचडीएफसी बँकेच्या शटरचा साईड पट्टा वाकवून चोरट्यांनी आत प्रवेश केला. काऊंटरचे ड्रॉ अस्ताव्यस्त केले. शिवाय एटीएम रुममध्येही प्रवेश केल्याचे निदर्शनास आले. या सर्व प्रकारामध्ये तिजोरी मात्र सुरक्षित राहिली. चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न अयशस्वी ठरला. चोरट्यांना तिजोरी उघडता आली नाही, हेच त्यावरून लक्षात आले.मंगळवारी सकाळी बँकेतील शिपाई साफसफाईसाठी गेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकाराची माहिती कळताच बँकेचे वरिष्ठ अधिकारी तसेच भोकरदन ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी पंचनामा करून श्वानपथकास पाचारण केले. परंतु श्वान बँकेच्या समोर अवघ्या ६० फूट परिसरातच घुटमळले. याप्रकरणी भोकरदन पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (वार्ताहर) बँकेच्या कार्यालयात सायरन असताना चोरट्यांनी आत प्रवेश केल्यानंतर ते वाजले नाही. सी.सी.टी.व्ही. कॅमेरे असूनही बँकेत अंधार असल्याचे कारण सांगून व्हिडीओ फुटेज मिळत नसल्याने या प्रकाराविषयी परिसरात नागरिक विविध तर्कवितर्क लावत आहेत. येथील एटीएम मशीन देखील असुरक्षित असल्याचे या प्रकारामुळे दिसून आले. कारण तेथे सुरक्षारक्षकाची नियुक्ती केलेली नाही. विशेष म्हणजे पोलिसांनी यापूर्वी दोन-तीन वेळा संबंधित बँक अधिकार्यांशी सुरक्षा रक्षक नेमण्याबाबत सूचना दिल्या होत्या. आठ दिवसांपूर्वी केदारखेडा येथील अन्य दुसरी बँक फोडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र चोरट्यांनी शटर तोडण्याचा प्रयत्न केल्यानंतर तेथील सायरन वाजल्याने चोरटे पसार झाले होते.
केदारखेड्यात बँक फोडण्याचा प्रयत्न
By admin | Updated: May 7, 2014 00:28 IST