जालना : वृक्ष लागवड योजनेला गतवर्षी दुष्काळाचा फटका बसल्याचे चित्र आहे. अत्यल्प पाऊस व पाणी पुरवठ्याच्या अपुरी सोय यामुळे शेकडो हेक्टरवरील रोपे जळून गेली आहेत. मात्र, वन विभागाने ७० टक्के रोपे जिवंत असल्याचा दावा केला आहे. वन विभाग तसेच सामाजिक वनीकरण विभागाकडून वृक्ष लागवडीसाठी कोट्यवधी रूपयांचा खर्च होत असला तरी त्याची फलश्रुती अपेक्षित होताना दिसून येत नाही. शंभर झाडे लावल्यास १० ते २० रोपे कसबशी तग धरून असतात. गतवर्षी तब्बल १ कोटी २९ लाख रूपये वृक्ष लागवडीसाठी वन विभागाने खर्ची केले. प्रत्यक्षात स्थिती मात्र विदारकच आहे. ४३० हेक्टरवर मोहा, साग, खैर, आंबा आदी आठ ते दहा प्रकारची मिळून ८ लाख ६० हजार रोपे लावण्यात आली आहेत. ही लागवड वनविभागाच्या १९ साईडवर करण्यात आली होती.यंदा ३ लाख ८२ हजार रोपांची लागवड करण्याचा संकल्प आहे. यातील पहिला टप्पा १ जुलै रोजी होणार आहे. या दिवशी १ लाख ५० हजार रोपांची लागवड करण्यात येणार आहे. यासाठी योग्य नियोजन पूर्ण झाल्याचे वन अधिकरी जी.एम.शिंदे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. यंदा रोपांची लागवड पारंपरिक पद्धतीऐवजी नवीन पद्धतीने रोपांची लागवड करण्यात येणार आहे. यासाठी वन विभागाकडून प्रात्यक्षिकही दाखविण्यात येणार आहे. मोह, खैर, साग, शिवम, आंबा, जांभूळ, सीताफळ आदी झाडांचा समावेश आहे.
वृक्ष संवर्धनाला ‘दुष्काळा’चा फटका!
By admin | Updated: June 5, 2016 00:35 IST