बीड : दिवाळीनिमित्त कुटुंबियांसमवेत गावी आलेले लोक आता परतीच्या मार्गावर असून ‘आरटीओं’च्या छुप्या आशीर्वादाने ट्रॅव्हल्सचालकांकडून दामदुप्पट दराने सर्रास लूट होत आहे. दलालांमार्फत बसस्थानकातील प्रवाशीही वळविले जात असून महामंडळही ठोस कारवाया करत नाही. ट्रॅव्हल्सचालकांना कोणाचा अंकुशच उरलेला नाही. त्यामुळे त्यांची ‘दिवाळी’ होत असताना सामान्य प्रवाशांचे मात्र दिवाळे निघत आहे.नोकरी, रोजगारासाठी पुणे, मुंबईला स्थायिक झालेली अनेक कुटुंबे दिवाळीला हमखास गावी येतात. चार दिवस गावी राहून पुन्हा महानगरांत परत करण्याची घाई सुरु आहे. त्यामुळे प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ही गर्दी ‘कॅश’ करण्यासाठी शहरातील ट्रॅव्हल्सचालक सरसावले असून प्रवाशांची अडवणूक सुरु आहे. ट्रॅव्हल्स फुल्ल झाली... आरक्षण संपले... असे बहाणे शोधत ट्रॅव्हल्सचालक अवाच्या सव्वा दराने भाडे घेतात. नोकरी, व्यवसायासाठी वेळेत हजर व्हायचे असल्याने प्रवाशीही जास्तीचे पैसे मोजून सीट पकडण्याचा प्रयत्न करतात. विशेष म्हणजे याविरुद्ध कोणी तक्रार करण्यासही धजावत नाही. त्यामुळे ट्रॅव्हल्सवाल्यांची मुजोरी वाढत आहे.दरम्यान, एसटी महामंडळाच्या वतीने मुंबईसाठी ७०३ रुपये तर पुण्यासाठी ३६७ रुपये भाडे आकारले जाते. ट्रॅव्हल्सचालक मात्र प्रतिप्रवाशी हजार ते बाराशे रुपयांपर्यंत भाडे वसूल करत आहेत. याचे मात्र कोणालाही सोयरसूतक नाही. महामंडळाने दिवाळीच्या तोंडावर प्रवाशी भाड्यात १० टक्के वाढ केली आहे. मात्र, आवश्यक तेवढ्या बसेस सोडल्या जात नाहीत. त्यामुळे महामंडळाला अपेक्षित उत्पन्न मिळणे कठीण होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. (प्रतिनिधी)
ट्रॅव्हल्सचालकांकडून प्रवाशांची दामदुप्पट लूट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2016 01:28 IST