औरंगाबाद : डिझेलचे दर वाढल्यामुळे राज्य परिवहन महामंडळाने २२ आॅगस्टपासून प्रवास भाड्यात सरासरी ०.८० टक्का वाढ केली आहे. यानंतर आता २८ आॅगस्टपासून एसटीच्या ‘आवडेल तेथे प्रवास’ योजनेचा पासदेखील ५ ते १० रुपयांनी महागला आहे. या पासला प्रवाशांची अधिक पसंती असते. परंतु या पासला प्राधान्य देऊन प्रवास करणाऱ्यांनाही आता दरवाढ सोसावी लागणार आहे. महामंडळाच्या औरंगाबाद विभागात ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ योजनेतील सात दिवसांच्या पासच्या तुलनेत चार दिवसांच्या पासला प्रवाशांचा अधिक चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते. या योजनेचा पास नियमित बस तसेच पंढरपूर, आळंदी, गौरी-गणपती, होळी आदी प्रसंगी सोडण्यात येणाऱ्या जादा, यात्रा बसेससाठीही लागू असल्यामुळे प्रवाशांची त्याला अधिक पसंती असते. डिझेल खर्च वाढल्यामुळे महामंडळाने नुकतीच प्रवास भाड्यात वाढ केली आहे. ही भाडेवाढ सरासरी ०.८० टक्का एवढी करण्यात आली. यानंतर आता आवडेल तेथे प्रवास योजनेच्या पासच्या दरात वाढ करण्यात आली आहे. आवडेल तेथे प्रवास पासवर औरंगाबादेतून कोल्हापूर, नागपूर, पुणे इ. विविध ठिकाणी जाण्याकडे अनेकांचा ओढा असतो. यापूर्वी देण्यात आलेले; परंतु २८ आॅगस्टपासून सुरू झालेले पास त्यांची मुदत संपेपर्यंत वैध असतील. या पासधारकांकडून दरातील फरक वसूल केला जाणार नाही.
‘आवडेल तेथे प्रवास’ पासही महागला
By admin | Updated: August 30, 2014 00:16 IST