लोकमत न्यूज नेटवर्कऔंढा नागनाथ : येथील बसस्थानकावर दुपारी २ वाजता प्रवाशांचे पाकिटांची चोरी करणाºया दोन महिलांना प्रवाशांनीच पकडून त्यांना पोलिसांच्या तावडीत देण्यात आले आहे. या अगोदर या महिलांना पकडण्यात आले होते; परंतु ठोस कारवाई न झाल्याने त्यांना सोडून देण्यात आले होते.औंढा नागनाथ बसस्थानकामध्ये औंढा नागनाथ- वसमत या बसमध्ये चढत असताना अंकुश वाशिमकर (रा.जिरेगल्ली औंढा) यांच्या खिशातून पॉकेट चोरी करण्यात आले. यावेळी दोन महिलांनी हे पॉकेट चोरल्याचे लक्षात आल्यानंतर अंकुशने प्रवाशांना गोळा करून त्यांना पकडले. पोलीस निरीक्षक डॉ. गणपत दराडे यांना याची माहिती दिली. त्यानुसार घटनास्थळी जमादार रमेश कोरडे, भीमराव चिंतारे, खिजर पाशा यांनी महिलेस ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात त्यांची झाडाझडती घेतली असता त्यांच्यासोबत असलेल्या पाच वर्षांच्या लहान मुलाजवळ प्रवाशांचे पाकिट आढळून आले. त्यामध्ये रोख पाच हजार होते. ते प्रवाशाला परत करण्यात आले; परंतु सदर महिला चोर या आपली ओळख पोलिसांना देत नव्हत्या. या अगोदर गतवर्षी त्यांना चोरी करताना पकडण्यात आले होते; परंतु पोलिसांनी काहीच कारवाई न करता सोडून दिले होते. सध्या या महिलेवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलीस ठाण्यात सुरू होती.
बसस्थानकातील पाकीटमार पोलिसांच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 23:49 IST