औरंगाबाद : सिडको वाहतूक शाखेतील एका पोलीस कर्मचाऱ्याचा कर्तव्यावर असतानाच हृदयविकाराने मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी सिडको वाहतूक शाखेच्या कार्यालयातच घडली. कचरूबाबूराव सोनवणे (४७, रा. वासडी, ता. कन्नड, ह. मु. मयूर पार्क, रामेश्वरनगर) असे मयत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते मागील २० वर्षांपासून पोलीस दलात कार्यरत असून सध्या पोलीस नाईक होते. टेम्पो मोबाईलवर कर्तव्यावर असताना दुपारचे जेवण करण्यासाठी ते कार्यालयात गेले होते. सोनवणे हे बुधवारी सकाळी कामावर आले. त्यांनी फौजदार एम. एस. पुरी यांच्यासोबत टेम्पोमध्ये काही बॅरिकेडस् आकाशवाणी चौकात नेले. तेथे काही वेळ बॅरिकेडस् लावण्याचे काम त्यांनी केले. त्यानंतर पोलीस निरीक्षक शिंदे यांना भेटण्यासाठी ते पोलीस आयुक्तालयात गेले. दुपारी २.३० वाजता ते सिडको वाहतूक शाखेच्या कार्यालयात गेले. तेथे अन्य कर्मचाऱ्यांसोबत त्यांनी जेवण केले. जेवणानंतर पाणी पीत असताना त्यांना अचानक चक्कर आली आणि ते जमिनीवर कोसळले. अन्य कर्मचाऱ्यांनी त्यांना तात्काळ एका खाजगी दवाखान्यात दाखल केले; परंतु तेथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून घाटीत नेण्याचा सल्ला दिला. रुग्णवाहिकेतून घाटीत नेत असताना सोनवणे यांचा रस्त्यातच मृत्यू झाला. घाटीत पोहोचल्यावर डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह मयूर पार्क येथे घरी नेण्यात आला. त्यानंतर एन-११ हडको येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कर्तव्यावर असतानाच सोनवणे यांचा मृत्यू झाल्यामुळे पोलीस दलातर्फे त्यांना श्रद्धांजली अर्पण करून सलामी देण्यात आली.कामाचा ताण असल्याची चर्चापोलीस नाईक कचरूसोनवणे यांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. कामाचा ताण असल्यामुळेच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याची चर्चा घाटी परिसरात सुरू होती. सोनवणे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, जावई असा परिवार आहे.
वाहतूक पोलिसाचा ‘आॅन ड्यूटी’ मृत्यू
By admin | Updated: May 12, 2016 01:00 IST