इम्रान शेख। लोकमत न्यूज नेटवर्कढोकी : मागील तीन-चार वर्षातील सततचा दुष्काळ, नापिकी यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक कंबरडे मोडले आहे़ ही बाब ओळखून ढोकी येथील शिवसेना शाखेने शेतकऱ्यांना खरीप पेरणीपूर्व मशागतीसाठी मोफत ट्रॅक्टर उपलब्ध करून दिले असून, त्याद्वारे कामे सुरू करण्यात आली आहेत़ मागील तीन-चार दिवसात तब्बल १६८ अल्पभूधारक शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरसाठी नाव नोंदणी केली आहे़उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी व परिसरातील शेतकरी सततच्या दुष्काळामुळे आर्थिक अडचणीत आला आहे़ शेतकरी आत्महत्येचे सत्रही सुरूच आहे़ अनेकांनी बैलजोड्या विकल्या असून, आता पेरणीपूर्व मशागतीच्या कामांचा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे़ ही बाब ओळखून ढोकी येथील शिवसेना शाखेचे प्रमुख प्रमोद इंगळे, पंस सदस्य संग्राम देशमुख, विभागप्रमुख गुणवंत देशमुख, गटप्रमुख जीवन घोडके, संतोष कंदले, भारत देशमुख, पांडुरंग वाकुरे, दगडू धावारे, दिलीप इंगळे, भारत चव्हाण, सतिष तिवारी, बसवेश्वर घोडके, राजू वाकुरे, लक्ष्मण देशमुख, अजित देशमुख, बालाजी परिट, उल्हास शिंदे, दत्ता साळुंके, मनोज साळुंके, सीधर रोंधवे, संजय जाधव, राजा माळी, रमेश वाकुरे यांच्यासह इतर पदाधिकारी, शिवसैनिकांनी पुढाकार घेऊन अल्पभूधारक शेतकऱ्यांना खरीपपूर्व मशागतीच्या कामासाठी मोफत ट्रॅक्टर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला़ ट्रॅक्टरमध्ये डिझेल भरा आणि आपल्या शेतातील पेरणीपूर्व मशागती करुन घ्या, असा संदेश गावात देण्यात आला आहे़ शाखेच्या वतीने अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी संपूर्ण गावात दवंडी देण्यात आली आहे़ अल्पभूधारक शेतकऱ्यांना नांगरण, कुळवण, मोगडणे, पाळी घालणे आदी कामांसाठी ट्रॅक्टरची उपलब्ध करून देण्यात आले आहे़ बहुभूधारक शेतकऱ्याला तीन एकरपर्यंत मर्यादा ठेवण्यात आली आहे़ या आवाहनाला अल्पभूधारक शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला आहे़ आजवर १६८ शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरसाठी शाखेकडे नोंदणी केली आहे. मागील तीन दिवसांमध्ये शाखेच्या ट्रॅक्टरद्वारे जवळपास ७० एकरावरील पेरणीपूर्व कामे केली आहेत़ शिवसेनेच्या ढोकी शाखेने हाती घेतलेला उपक्रम कौतुकाचा विषय बनला आहे़
पेरणीपूर्व मशागतीसाठी ट्रॅक्टर मोफत
By admin | Updated: May 22, 2017 23:39 IST