लातूर : व्यापाऱ्यांकडून मिळणारी हमाली वाढवून देण्यावरून लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमाल, मापाडी, गाडीवान संघटनेने संप पुकारला होता. त्यामुळे सहा दिवस बाजार समितील सौदा बंद झाला होता. शुक्रवारी बाजार समितीतील व्यवहार पूर्ववत झाला. दरम्यान, हरभऱ्याची आवक दुप्पट होऊन ती २५ हजार ८७३ क्विंटलवर पोहोचली. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांकडून मिळणाऱ्या हमालीच्या दरात वाढ करून मिळावी, या मागणीसाठी हमाल, मापाडी, गाडीवान संघटनेने संप सुरू केला होता. गुरुवारी अखेर त्यावर तोडगा निघाल्याने सहा दिवसांनंतर शुक्रवारपासून बाजार समितीतील व्यवहार पूर्ववत झाले. सहा दिवस बाजार समिती बंद असल्याने शेतीमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांची अडचण झाली होती. परिणामी, शुक्रवारी शेतमालाची आवक मोठी होती. हमालांच्या संपामुळे चार दिवस बाजार समिती बंद होती. त्यामुळे शुक्रवारी हरभऱ्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली. दर मात्र स्थिर असल्याचे सचिव मधुकर गुंजकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
हरभऱ्याची आवक झाली दुप्पट
By admin | Updated: April 8, 2017 00:11 IST