औरंगाबाद : मालमत्ता कर वाढविण्यासंदर्भात मंगळवारी मनपा प्रशासनाने एक प्रस्ताव सर्वसाधारण सभेसमोर ठेवला होता. करवाढ न करता नागरिकांकडे असलेली २९० कोटी रुपयांची थकबाकी वसूल करा, असा आदेश महापौर त्र्यंबक तुपे यांनी प्रशासनाला दिला.मालमत्ता कराच्या मुद्यावर तहकूब सर्वसाधारण सभेत जोरदार चर्चा सुरू झाली. नगरसेवकांनी अनेक मालमत्तांना करच लावण्यात आला नाही. अधिकारी व कर्मचारी कामच करीत नाहीत आदी आरोपांच्या फैरी झाडल्या. या चर्चेत राजेंद्र जंजाळ, नंदू घोडेले, शेख समिना, बापू घडामोडे, कैलास गायकवाड, शिल्पा राणी वाडकर, अज्जू नाईकवाडी, विकास एडके, माधुरी अदवंत, कीर्ती शिंदे आदींनी सहभाग घेतला. नगरसेवकांच्या चर्चेला उत्तर देताना उपायुक्त अय्युब खान यांनी सांगितले की, दरवर्षी वसुलीचे डिमांड उशिरा जात होते. यंदा महापौर तुपे व आयुक्त बकोरिया यांनी १० एप्रिलपूर्वी १ लाख ९७ हजार मालमत्तांचे डिमांड वाटण्यास भाग पाडले. शहरातील ४० टक्के मालमत्तांना कर लावला नाही. संपूर्ण मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यासाठी टेंडर मागविण्यात आले आहे. उद्या हे टेंडर उघडण्यात येणार आहेत. खाजगी एजन्सीकडून फक्त सर्वेक्षणाचे काम करून घेण्यात येईल. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ४५ दिवसांमध्ये वसुली साडेसहा कोटींनी पुढे आहे. प्रत्येक मालमत्तेला कर लागल्यास मनपाला ३५० कोटी रुपयांपर्यंत महसूल प्राप्त होऊ शकतो, असा दावा खान यांनी केला.
मालमत्ता कराची थकबाकी २९० कोटी
By admin | Updated: May 11, 2016 00:51 IST