अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाईपर्यायी व्यवस्था म्हणून अंबाजोगाई शहराला काळवटी साठवण तलावातून पाणीपुरवठा होत आहे. संपूर्ण शहराची तहान भागविण्यासाठी हा तलाव अपुरा पडत आहे. साठलेला गाळ काढणे व तलावाची २ मीटरने उंची वाढविण्याचे काम गेल्या पाच वर्षांपासून रखडले आहे. प्रशासनाच्या टोलवाटोलवीच्या कारभारात काम रखडले आहे. सिंचनासाठी काळवटी साठवण तलावाची निर्मिती झाली. ११ वर्षांपूर्वी हा तलाव पूर्ण झाला. तीन वर्षे सिंचनासाठी या तलावाच्या माध्यमातून मोठी मदत झाली. मात्र सध्या शहराला जाणवणाऱ्या पाणीटंचाईसाठी काळवटी साठवण तलाव आरक्षित करण्यात आला. येथून तातडीची पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाली.सात वर्षांपासून काळवटी तलावातून पाणी शहराला पिण्यासाठी दिले जाते. साठवण क्षमता १.२५ द.ल.घ.मी. एवढी असून शहराला दररोज किमान १ कोटी २० लाख लिटर पाण्याची आवश्यकता भासते. मांजरा धरणातून पाणीपुरवठा बंद झाल्याने व संपूर्ण शहराची मदार काळवटी साठवण तलावाच्या पाण्यावर असल्याने आता दररोज ४० ते ५० लाख लिटर पाणी दिले जाते. तलावाची साठवण क्षमता आणि शहराची गरज पाहता हा तलाव पाणीपुरवठ्यासाठी अत्यंत अपुरा पडतो.या वर्षी जाणवणाऱ्या पाणीटंचाईसाठी पुन्हा साकूड येथील साठवण तलाव आरक्षित केला आहे.काळवटी साठवण तलावाची उंची दोन मीटरने वाढविल्यास आहे ह्या पेक्षा मोठ्या स्थितीत पाणीसाठा अंबाजोगाई शहराला उपलब्ध होईल. यासाठी लघुपाटबंधारे विभाग यांच्याकडे दोन मीटरने उंची वाढविण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. गेल्या पाच वर्षांपासून नगर परिषद प्रशासनाचा या प्रश्नी सातत्याने पाठपुरावाही सुरू आहे. मात्र प्रशासनाच्या टोलवाटोलवीच्या व लालफितीच्या कारभारामुळे तलावाची उंची वाढविण्याचे काम गेल्या पाच वर्षांपासून रखडलेल्या स्थितीत आहे.
टोलवाटोलवीमुळे उंची वाढविण्याचे काम रखडले
By admin | Updated: April 12, 2016 00:36 IST