औरंगाबाद : नागपूर, भोपाळ आणि दिल्लीच्या सहा नामवंत कलाकारांनी एकत्र येऊन औरंगाबादेत ‘नाऊ’ म्हणजेच वर्तमान दाखविणारे चित्रप्रदर्शन आयोजित करण्याचा निर्णय घेतला. सेव्हन हिल परिसरातील मिरर आर्ट गॅलरीत २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता प्रसिद्ध कवी दासू वैद्य यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.नागपूरचे प्रा. चंद्रकांत चन्ने, प्रा. प्रमोद बाबू रामटेके, रघू नेवरे, दिल्लीचे पंकज मानव, भोपाळचे मोहन शिंगणे आणि रजनी शिंगणे यांच्या एकूण ५० कलाकृती या चित्रप्रदर्शनात पाहायला मिळणार आहेत. अमूर्त, वास्तव आणि संकल्पनात्मक अशा विविध शैली असणारे हे चित्रकार पहिल्यांदाच औरंगाबादेत आपल्या कलाकृती प्रदर्शित करीत आहेत. भारताच्या वेगवेगळ्या भागांतील या सहा चित्रकारांच्या चित्रशैली, पद्धती माध्यम आणि चित्रसंकल्पना पूर्णपणे वेगळ्या आहेत. एक अनोखे चित्रप्रदर्शन रसिकांना पाहायला मिळणार आहे. प्रदर्शनाचे औचित्य साधून मिरर कला दालनात २५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता प्रा. चंद्रकांत चन्ने यांचा ‘बालचित्रे आणि आधुनिक चित्रकारांनी त्याचा केलेला अवलंब’ या विषयावर चर्चात्मक कार्यक्रम आयोजित केला आहे. सायं. ५.३० वाजता प्रा. प्रमोदबाबू रामटेके यांचे व्यक्तिचित्रणावरील प्रात्यक्षिक होईल. रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
‘नाऊ’ चित्रप्रदर्शनाचे आज उद्घाटन
By admin | Updated: September 24, 2014 01:04 IST