लोकमत न्यूज नेटवर्कअंबड : जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी अंबडच्या अपात्र ठरविलेल्या भाजपाच्या दोन नगरसेविकेंच्या भवितव्याबाबत नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्यासमोर ३० आॅगस्ट रोजी मंत्रालयात सुनावणी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने १० जुलैला नगरविकास राज्यमंत्री पाटील यांना सदर प्रकरणी दहा आठवड्यांत निर्णय घेण्याचे आदेश दिले होते.शहरातील प्रभाग क्रमांक एकमधील भाजपाच्या नगरसेविका अंसाबाई बाबर व प्रभाग क्रमांक आठमधील भाजपाच्याच नगरसेविका मुक्ता पुंड यांना दोनपेक्षा अधिक अपत्य असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभावती कुरेवाड व सावित्री गुढे यांनी जिल्हाधिकारी जोंधळे यांच्याकडे केली होती. या प्रकरणी सुनावणी दरम्यान दोन्ही बाजू ऐकून जिल्हाधिकाºयांनी दोन्ही नगरसेविकांना २ जून रोजी अपात्र ठरविले.अपात्र ठरविलेल्या बाबर व पुंड या दोन्ही नगरसेविकांनी १२ जूनला जिल्हाधिकाºयांच्या निर्णया विरोधात नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्याकडे दाद मागितली. त्याच दिवशी राज्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाºयांच्या निर्णयाला तात्पुरती स्थगिती देण्याचे आदेश दिले होते. प्रकरण न्यायप्रविष्ट असून राज्यमंत्र्यांनी आमची बाजू ऐकून न घेता स्थगिती आदेश दिला असल्याने राज्यमंत्र्यांनी दिलेली स्थगिती बेकायदेशीर असल्याची याचिका तक्रारकर्त्या कुरेवाड व गुढे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली होती.
अपात्र नगरसेविकांच्या भवितव्याचा आज फैसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 00:46 IST