हणमंत गायकवाड लातूरडालडा फॅक्टरीच्या विकत घेतलेल्या ६ एकर जागेपैकी ४ एकर जागेत समाजकल्याण विभागाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन उभे केले आहे. मात्र या जागेचे खरेदीखत होण्यापूर्वी १२ लाख ४९ हजार ७२८ रुपयांचे वीजबिल थकले आहे. त्यामुळे सामाजिक न्याय भवनाला महावितरणकडून वीजजोडणी देण्यास टाळाटाळ केली जात आहे. पूर्वीचे वीजबिल भरा आणि मीटर घ्या, असे महावितरणचे म्हणणे असल्याने विजेअभावी आंबेडकर भवनात समाजकल्याण विभागाचे हस्तांतरण रखडले आहे. सामाजिक न्याय विभागाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनासाठी सहकारी विभागाच्या मालकीची ६ एकर जागा २००९-१० मध्ये खरेदी केली. आता या जागेत सामाजिक न्याय विभागाने भव्य डॉ. आंबेडकर भवन साकारले आहे. या भवनात सामाजिक न्याय विभागाची सर्व कार्यालये हस्तांतरीत होणार आहेत. परंतु, वीजजोडणी नाही. खरेदीखत होण्यापूर्वी या जागेत मे. लिक्वीडेटर को-आॅपरेटिव्ह इंडस्ट्रीजसाठी वीजजोडणी होती. त्याचे वीजबिल १२ लाख ४९ हजार ७२८ रुपये थकित आहे. खरेदीखत होताना सहकार विभागाने हे वीजबिल भरण्याचे मान्य केलेले होते. आता या जागेतील सामाजिक न्याय भवनासाठी वीजजोडणी हवी आहे. मात्र महावितरणने पूर्वीच्या सहकार विभागाच्या आखत्यारीत असताना घेतलेल्या मीटरचे थकित वीजबिल अदा केल्याशिवाय वीजजोडणी देता येणार नाही, असे सामाजिक न्याय विभागाला कळविले आहे. ही बाब समाजकल्याण विभागाने जिल्हा उपनिबंधकांना कळविली आहे. थकित वीजबिल भरण्याचे जिल्हा उपनिबंधकांनी तोंडी मान्य केले असले तरी महावितरणकडून समाजकल्याणच्या आंबेडकर भवनाला वीजजोडणी मिळाली नाही. वीज जोडणीसाठी २६ जुलै २०१६ आणि ७ सप्टेंबर २०१६ रोजी समाजकल्याण विभागाने महावितरणकडे अर्ज केला. मात्र टाळाटाळ केली जात आहे.
‘सहकार’चे थकित वीजबिल ‘समाजकल्याण’च्या माथी !
By admin | Updated: October 15, 2016 00:51 IST