उस्मानाबाद : दीर्घ सुटीनंतर बुधवारपासून नवीन शैक्षणिक वर्षातील पहिल्या सत्रास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. विविध वेषभूषेतील विद्यार्थ्यांची गावांतून मिरवणूक काढण्यात आली. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळेच्या प्रवेशद्वारातच सुबक रांगोळी काढून नवागत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. शाळेच्या पहिल्यास दिवशी जिल्हाभरातील सुमारे तीन लाखावर विद्यार्थी शाळेत दाखल झाले.जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून प्रवेशोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली होती. पहिलीच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांचे काही दिवसांपूर्वीच सर्वेक्षण करण्यात आले होते. सुमारे २७ हजारावर विद्यार्थी पहिलीच्या वर्गात प्रवेश घेण्यास पात्र होते. त्यानुसार ग्रामस्थांसह शिक्षकांनी शाळेच्या आदल्या दिवशी म्हणजेच मंगळवारीच घरोघरी जावून बालकांना शाळेत पाठविण्याचे आवाहन केले होते. शिक्षण विभागाकडून गटशिक्षण अधिकाऱ्यांना पत्र देऊन विद्यार्थ्यांच्या स्वागतामध्ये कुठल्याही स्वरूपाची कुचराई करू नये, असे निर्देश दिले होते. त्याचप्रमाणे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शाळांना भेटी देऊन प्रवेशोत्सवासाठी हजेरी लावण्याबाबत फर्मान काढले होते. बुधवारी सकाळी सात वाजल्यापासून शाळाशाळांमध्ये प्रवेशोत्सवाची लगबग दिसून येत होती. प्रवेशास पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांचे शाळेच्या पहिल्याच दिवशी पहिलीच्या वर्गात अधिकाअधिक प्रवेश व्हावेत यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून गावातून विद्यार्थ्यांची जंगी मिरवणूक काढण्यात आली. या माध्यमातून विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याचे आवाहन केले. दरम्यान, मिरवणुकीनंतर त्या-त्या भागातील जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, सरपंच, ज्येष्ठ नागरीक आदींच्या हस्ते नवागत विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. गणवेश, मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटपही करण्यात आले. एकूणच बुधवारी जिल्हाभरातील शाळांमध्े प्रवेशोत्सवाची धामधूम पहावयास मिळाली.
जिल्ह्यातील तीन लाखांवर विद्यार्थी स्कूल चले !
By admin | Updated: June 16, 2016 00:07 IST