येरमाळा : येरमाळा पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून, मंगळवारी पहाटेच्या सुमारास येरमाळा येथे दोन तर वडजी येथे एक घर फोडून चोरट्यांनी एक लाख, ४२ हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केला़ तर वडजी येथे चोरी झाल्याचा प्रकार लक्षात येताच ग्रामस्थांनी सिनेस्टाईल पाठलाग करून तीन चोरट्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले़ पोलिसांनी सांगितले की, येरमाळा येथील राजेंद्र सुखदेव बारकूल यांच्या घराचे चोरट्यांनी सोमवारी पहाटे कुलूप तोडून आत प्रवेश केला़ आतील रोख रक्कम, सोन्याचे दागिने असा ५७ हाजार, ९०० रूपयांचा मुद्देमाल लंपास केला़ या प्रकरणी येरमाळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तर येरमाळा येथीलच यादवतात्या बारकुल यांच्या घरातील १५ हजार रूपयांचा मुद्देमालही चोरट्यांनी लंपास केला़ या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला नव्हता़ यापूर्वीच ४ मे रोजी वडजी (ता़वाशी) येथील तीन घरे फोडून चोरट्यांनी साडेतीन लाखांचा ऐवज लंपास केला होता़ तर मंगळवारी पहाटेच्या सुमारास प्रताप लक्ष्मण डांगे यांच्या जुन्या घराचे चोरट्यांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला़ आतील कोटीतील सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा ७० हजार रूपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला़ मात्र, चोरी झाल्याचे शेजारील तुकाराम डांगे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरड केली़ त्यावेळी जागे झालेल्या ग्रामस्थांनी चोरट्यांचा सिनेस्टाईल पाठलाग करून विष्णू राजाभाऊ सारूक (रा़नांदगाव), सुरेश मच्छा काळे (रा़चुंब) व विलास रतन पवार (रा़लक्ष्मी पारधीपेढी तेरखेडा ) या तिघांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले़ त्या तिघाकडून कोणताच मुद्देमाल हाती लागला नाही़ या प्रकरणी डांगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून येरमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे़ (वार्ताहर) १० घरफोड्या येरमाळा पोलिस ठाण्याच्या हद्दीत गत दहा दिवसात जवळपास १० घरफोड्या करून चोरट्यांनी १२ लाखांचा मुद्देमाल लंपास केला आहे़ त्यातच ट्रकचालकाचा खून करून साबुदाण्यासह ट्रक पळवून नेल्या प्रकरणाचा अद्याप उलगडा झालेला नाही़ तर चोरट्यांनी घरफोडीचे सत्र सुरूच ठेवल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली असून, पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांतून करण्यात होत आहे़
येरमाळा, वडजी येथे तीन घरफोड्या
By admin | Updated: May 7, 2014 00:41 IST