कळंब : विभागीय आयुक्तांनी आॅक्टोबर महिन्यात काढलेल्या परिपत्रकाचा दाखला देत कळंब नगर परिषदेने तीन बांधकामांना अनधिकृत धार्मिक स्थळ घोषित करून ते पाडण्याच्या सूचना दिल्या आहेत. विशेष म्हणजे, यापैकी एक नोटीस नगरसेविकेच्या पतीलाच बजाविण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.कळंब पालिकेने २९ डिसेंबर २०१५ रोजी शहरातील तिघांना नोटीस बजावली आहे. विभागीय आयुक्त यांचे दि. १७ आॅक्टोबर २०१५ रोजीच्या पत्रकाचा संदर्भ देवून आपण केलेले बांधकाम तात्काळ काढून घ्यावे, अन्यथा पालिकेमार्फत हे बांधकाम काढून त्याचा खर्च आपणाकडून वसूल केला जाईल किंवा आपणावर फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल, असेही या नोटिसीत म्हटले आहे.शहरातील बाबा नगर, जुने पोस्ट आॅफिस आणि आणखी एका ठिकाणी असलेल्या बांधकामासंदर्भात पालिकेने या नोटिसा बजावल्या आहेत. यात अनधिकृत धार्मिक स्थळ निष्कासित करण्याबाबत नोटीस असल्याचे म्हटले आहे. परंतु, ज्या बांधकामांना पालिकेने धार्मिक स्थळ म्हटले आहे, त्यामध्ये अजून कोणत्याही देवतांची मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आलेली नाही. तरीही ते धार्मिक स्थळ कसे ठरविण्यात आले, हाही मुद्दा पुढे येवू लागला आहे. (वार्ताहर)
तीन बांधकामे अनधिकृत घोषित
By admin | Updated: January 5, 2016 00:07 IST