कन्नड : तालुक्यातील वडनेर ग्रामपंचायतअंतर्गत असलेल्या तवल्यागड तांडा येथील तीन मुलांचा पाझर तलावात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी घडली.वडनेरचे उपसरपंच गुलचंद लखू चव्हाण यांनी भ्रमणध्वनीवरून माहिती देताना सांगितले की, तवल्यागड तांडा येथील गणेश दिनेश राठोड (१०), निखिल विजय चव्हाण (६) व विशाल ऊर्फ रोशन राजू चव्हाण (१०) हे शुक्रवारी दुपारी बोरे खाण्याच्या निमित्ताने गावापासून जवळच असलेल्या धरणाकडे गेले. सायंकाळी एका मुलाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसल्याने ग्रामस्थ धरणाकडे धावले. त्यावेळी काठावर तिघांचेही कपडे आढळून आले. एकाचा मृतदेह तरंगताना दिसल्याने हा मृतदेह बाहेर काढण्यात आला व उर्वरित दोघांचा धरणातील पाण्यात शोध घेण्यात आला. त्यावेळी दोघांचे मृतदेह सापडले. मयत तिन्ही मुले कन्नड येथील कै. काशीनाथराव पाटील जाधव शाळेचे विद्यार्थी होते. त्यापैकी गणेश राठोड व विशाल चव्हाण इयत्ता चौथीत, तर निखिल चव्हाण इयत्ता पहिलीत शिकत होता. शाळेची सहल पुणे येथे शुक्रवारी सायंकाळी निघणार असल्याने सहलीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना तयारी करण्यासाठी सुटी देण्यात आली होती; मात्र हे विद्यार्थी शुक्रवारीही शाळेत गैरहजर होते. या तिन्ही मुलांवर शोकाकुल वातावरणात तवल्यागड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. (वार्ताहर)
तवल्यागड येथील तीन मुलांचा तलावात बुडून मृत्यू
By admin | Updated: December 6, 2014 00:18 IST