लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शासनाने भरती करण्यास मनाई केली असतानाही २0१२ नंतर खाजगी शिक्षण संस्थांनी प्रक्रियेत अनेक त्रुटी ठेवून नेमणुका दिलेल्या ४५ शिक्षकांचे वेतन बंद झाले आहे. हे वेतन पूर्ववत सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन माध्यमिकचे शिक्षणाधिकारी दीपक चवणे यांना देण्यात आले आहे.हिंगोली जिल्ह्यात विविध खाजगी शिक्षण संस्थांनी २0१२ नंतर राबविलेल्या भरती प्रक्रियेत अनेक त्रुटी आढळल्या होत्या. या शिक्षकांची वैयक्तिक मान्यता रद्द करण्याचा आदेश शिक्षणाधिकाऱ्यांनी काढल्यानंतर खळबळ उडाली होती. तब्बल ४५ शिक्षक यात घरी बसले आहेत. त्यामुळे त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यातील काही शिक्षकांनी न्यायालयात धाव घेतली आहे. आज शिक्षणाधिकारी दीपक चवणे यांनाही निवेदन दिले आहे. याशिवाय आणखी २४ शिक्षकांवर याच अनुषंगाने कारवाईची टांगती तलवार आहे. या शिक्षकांवरही लवकरच कारवाई होण्याची दाट शक्यता आहे.शिक्षणाधिकारी चवणे म्हणाले, शासनाच्या आदेशानुसारच या शिक्षकांची वैयक्तिक मान्यता रद्द केली आहे. आता शासन किंवा न्यायालयाने त्यांना दिलासा दिला तरच त्यांच्यासाठी काहीतरी करणे शक्य आहे. याबाबत न्यायालयातही प्रकरणे गेली आहेत. त्याच्या सुनावणीला मला प्रत्यक्ष हजर राहायचे आहे. त्यामुळे आताच यावर भाष्य करणे योग्य होणार नाही. शिक्षकांनी वेतनासाठी निवेदन दिलेले आहे.
‘त्या’ शिक्षकांनी दिले शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन
By admin | Updated: July 11, 2017 00:24 IST