बीड : संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत जिल्ह्यातील दीडशेवर ग्रामपंचायतींची लवकरच तालुकास्तरीय तपासणी होणार आहे. अधिकाऱ्यांना तपासणीसाठी स्वत:चा तालुका वगळून इतर तालुके दिले आहेत. २० जानेवारीपर्यंत त्यांना सीईओ यांना अहवाल द्यावयाचा आहे.पाणंदमुक्त असलेल्या गावांमध्येच संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबविले जाते. २०१५-१६ मध्ये १०५ गावे पाणंदमुक्त झाली असून, चालू वर्षी ३२० ग्रामपंचायतींचा आराखड्यात समावेश आहे; मात्र आतापर्यंत केवळ ४० गावेच पाणंदमुक्त झाली आहेत. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता योजना राबविण्यासाठी पात्र असलेल्या दोन वर्षांतील या ग्रामपंचायतींची तालुकास्तरीय तपासणी डिसेंबर २०१६ ते २० जानेवारी २०१७ पर्यंत पूर्ण करावयाची आहे. त्या अनुषंगाने जि.प. स्वच्छ भारत मिशनने पथके नेमली असून, ते लवकरच संबंधित गावांमध्ये धडकणार आहेत. एकूण १४ मुद्यांवर आधारित ही तपासणी होणार असून, १०० गुणांचे मूल्यांकन विशिष्ट प्रारूप आराखड्यात केले जाणार आहे. तालुका स्तरावर निवड झालेल्या ग्रामपंचायती जिल्हास्तरावरील मूल्यांकनासाठी पात्र राहतील. या तपासणीच्या पार्श्वभूमीवर सहभागी ग्रामपंचायती कामाला लागल्या आहेत. स्वच्छतेकडे कटाक्षाने लक्ष दिले जात आहे. (प्रतिनिधी)
दीडशे ग्रा.पं.ची कसून तपासणी
By admin | Updated: December 27, 2016 00:03 IST