औरंगाबाद : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सुरू होण्यापूर्वी सेनेच्या महिला सदस्यांनी अध्यक्ष श्रीराम महाजन यांच्या दालनासमोर निषेधाचे फलक हातात घेऊन ठिय्या आंदोलन केले. महिला सदस्यांना सातत्याने डावलले जात असल्यामुळे यावेळी पदाधिकारी व प्रशासनाचा निषेध केला. निषेधाच्या घोषणा देत महिला सदस्यांनी अध्यक्षांच्या दालनासमोरच ठिय्या मांडला. त्यानंतर काही वेळाने अध्यक्ष महाजन हे दालनाबाहेर आले व त्यांनी त्या सर्व सदस्यांना दालनात बसून चर्चा करू, आतमध्ये येण्याची विनंती केली; पण महिला सदस्यांनी दालनात जाण्यास नकार देत घोषणा सुरूच ठेवल्या. त्यानंतर अध्यक्षांनी दालनाबाहेरच महिला सदस्यांचे निवेदन स्वीकारले व सर्वांची कामे करण्याचा विश्वास दिला. झाले असे की, माजी बांधकाम सभापती अविनाश पाटील गलांडे यांच्या नेतृत्वाखाली जि.प. सदस्य नंदाबाई काळे, अनिता राठोड, संगीता सुंब, सिंधू पिवळ, मनीषा मगर, नंदा ठोंबरे, मंजूषा जैस्वाल, चंद्रकला वळवळे, शारदा गीते आदींनी सकाळी जि.प. मुख्यालयात आल्यानंतर थेट अध्यक्षांचे दालन गाठले व बाहेर दालनाच्या प्रवेशद्वारातच ठिय्या मांडला. जिल्हा परिषदेत मोजक्याच सदस्यांची कामे केली जातात. मागील चार वर्षांपासून महिला सदस्यांचे एकही काम केलेले नाहीत. ‘पक्षपाती पदाधिकारी व प्रशासनाचा निषेध असो. आमची कामे झालीच पाहिजेत, जय भवानी-जय शिवाजी’ अशा घोषणा देत अध्यक्षांचा लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. आर्थिक वर्ष संपुष्टात येण्यासाठी आता तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. जिल्हा विकास निधीतून सिंचनाच्या कामासाठी १४ कोटी, तर उपकरातून सिमेंट बंधारे व कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या कामांसाठी ९ कोटी रुपयांचा निधी मंजूर असताना अध्यक्ष महाजन यांनी आतापर्यंत एक रुपयाच्या कामालादेखील मान्यता दिलेली नाही. ग्रामीण भागात रस्त्यांची अवस्था बिकट आहे. दलित वस्ती सुधार योजनेच्या फायली दडपून ठेवल्या आहेत. प्राप्त निधीतून सर्व सदस्यांना कामांसाठी समान वाटप व्हावे, अशा मागण्या केल्या.
अध्यक्षांच्या दालनासमोर सभेपूर्वी ठिय्या आंदोलन
By admin | Updated: December 23, 2015 00:03 IST