माजलगाव : येथील बसस्थानक व आठवडी बाजारात रविवारी चोरांनी दिवसा धुडगूस घालून ऐवज लंपास केला. चोरांचा पाठलाग करणाऱ्या एकावर चोरांनी विळी व बतईने हल्ला चढविला.रवींद्र सुरनर हे नांदेडला जाण्यासाठी बसची प्रतीक्षा करीत थांबले होते. तीन चोरांनी त्यांच्या खिशातील पाकीट लंपास केले. त्यामध्ये ५५०० रूपये होते. शिवाय, त्यांचा मोबाईल हिसकावून नेला. त्यांच्या शेजारी उभ्या असलेल्या मच्छिंद्र काळे (रा. सांडस चिंचोली) यांच्या खिशातीलदीड हजार रूपये व मोबाईल लांबवला.दरम्यान, काळे यांनी त्यांचा पाठलाग केला असता ते आठवडी बाजाराच्या दिशेने पळाले. भाजी विके्रत्याकडील विळी व बतई फेकून मारल्यामुळे काळे यांच्या डोक्याला जखम झाली. त्यानंतर या तिघांनी फुलेनगर भागामध्ये नंदा शिंदे, शैला टाक व विठ्ठल संक्राते यांच्या घराच्या खिडक्या तोडून आत प्रवेश करीत कुटुंबियांना मारहाण केली. या घटनेनंतर शहर ठाण्याचे फौजदार एस. एस. अंधारे यांनी शिवाजी उर्फ बाबू वचिष्ट शिंदे याला पाठलाग करून पकडले. उर्वरित दोघे फरार आहेत. शहर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (वार्ताहर)
चोरांचा दिवसा धुडगूस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2017 23:18 IST