उस्मानाबाद : बार्शी येथील इलेक्ट्रीक दुकानाचे गोडाऊन फोडून केलेल्या चोरी प्रकरणातील फरार आरोपितास दरोडा प्रतिबंधक पथकाने जेरबंद केले़ ही कारवाई कन्हेरवाडी शिवारात करण्यात आली असून, त्याच्याकडून चोरीतील दोन लाखाचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे़पोलिसांनी सांगितले की, बार्शी येथील अविनाश शिवाजी बाबर यांचे लक्ष्याचेवाडी शिवारात इलेक्ट्रॉनिक वस्तुंचे गोडाऊन आहे़ ते २६ जानेवारी रोजी नेहमीप्रमाणे आपले कामकाज अटोपून घरी गेले होते़ सकाळी ते गोडाऊनकडे आले असता मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी गोडाऊन फोडल्याचे त्यांच्या लक्षात आले़ त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली़ या गोडाऊनमधील एल़ई़डी व इतर इलेक्ट्रीक वस्तूंची चोरी झाली होती़ या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ दरोडा प्रतिबंधक पथकाचे पोउपनि भास्कर पुल्ली व त्यांचे सहकारी १२ मार्च रोजी कन्हेरवाडी शिवारात चोरीच्या शोधार्थ असताना त्यांना बार्शी येथील चोरी प्रकरणातील दिपक अनिल काळे (रा़येरमाळा) हा कन्हेरवाडी शिवारात असल्याची माहिती मिळाली होती़ या माहितीनंतर पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे, अप्पर पोलीस अधीक्षक बाळकृष्ण भांगे, स्थागुशाचे पोनि माधव गुंडीले यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा प्रतिबंधक पथकाचे पोउपनि पुल्ली यांच्यासह पोना सुनिल कोळेकर, सचिन कळसाईन, वाहेद मुल्ला, चालक काका शेंडगे यांनी सापळा रचून कारवाई केली़ कारवाईवेळी पळून जाण्याच्या प्रयत्नातील दिपक काळे याला पकडले़ त्याने चोरी प्रकरणाची कबुली दिल्यानंतर त्याच्याकडील २ लाख रूपयांच्या दहा एल़ई़डी़ टीव्ही जप्त करण्यात आल्या आहेत़ पुढील कारवाईसाठी त्यास बार्शी पोलिसांच्या ताब्यात दिल्याचे पोलिसांनी सांगितले़ (प्रतिनिधी)
मुद्देमालासह चोरटा जेरबंद
By admin | Updated: March 13, 2015 00:41 IST