औरंगाबाद : औरंगाबादेत कोरोना लसीचा साठा ठेवण्यासाठी वॉक इन कोल्ड स्टोअरेज तयार करण्यासाठी जागा निश्चित झाली; पण अद्याप त्यासाठीची यंत्रसामग्री मिळण्याची प्रतीक्षा आहे.
सध्या प्रत्येकाचे लक्ष कोरोनाची लस कधी येणार याकडे लागले आहे. ही लस आल्यावर ऐनवेळी धावपळ उडू नये, यासाठी पूर्वतयारी केली जात आहे. लसीचा साठा ठेवण्यासाठी वॉक इन कोल्ड स्टोअरेज तयार करण्यात येत आहे. त्यासाठी आरोग्य उपसंचालक कार्यालयातील तळमजल्यावर उपलब्ध जागेची निवड झाली आहे. शहरात छावणीत आणि सिडकोतील प्रशिक्षण केंद्रात शासकीय कोल्ड स्टोअरेज आहे.
याबरोबरच आरोग्य उपसंचालक कार्यालयाच्या तळमजल्यावर कोल्ड स्टोअरेज तयार करण्यात येणार आहे. आरोग्य कर्मचारी आतमध्ये ये-जा करू शकतील, असे हे स्टोअरेज राहील. गेल्या महिनाभरात जागा निश्चित झाली; परंतु यंत्रसामग्रीअभावी अद्यापही स्टोअरेजचे काम सुरू झालेले नाही.
आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
कोरोनाची लस ही प्रत्येक वयाच्या व्यक्तीला द्यावी लागणार आहे. त्यामुळे आतापर्यंतचे मोठे लसीकरण ठरणार आहे. अन्य लस आणि कोरोना लस यात काय फरक राहील, यासंदर्भात आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
लवकरच मिळणार यंत्रसामग्री
वॉक इन कोल्ड स्टोअरेजसाठी लवकरच यंत्रसामग्री मिळेल. ते प्राप्त होताच कोल्ड स्टोअरेज उभे करण्यासाठी फार वेळ लागणार नाही. इतर लस आणि कोरोना लस यात काय फरक राहील, यासंदर्भात आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही दिले जाणार आहे.
- डॉ. स्वप्नील लाळे, आरोग्य उपसंचालक