औरंगाबाद : शहरातील ११९ गुंठेवारी वसाहतींतील डीपी रोडवरील घरे नियमित करण्यात दलालांची चलती आहे. जुन्या मालकी हक्कावर घरे नियमित करून देणारे रॅकेट अधिकाऱ्यांमुळे निर्माण झाल्याचा खळबळजनक आरोप आजच्या स्थायी समितीमध्ये करण्यात आला. २००१ पूर्वीच्या मालमत्ता गुंठेवारी अधिनियमानुसार नियमित केल्या जातात. त्या मालमत्तांचे खरेदी-व्रिकी व्यवहार २००१ नंतर झालेले असतील तर त्या नियमित होण्यात कायदेशीर अडचणी आहेत. मात्र, पालिकेतील काही अधिकाऱ्यांनी यामध्ये पळवाट शोधून काढली आहे. जुन्या खरेदीखतानुसार मालकीहक्क दाखवून गुंठेवारी घरे नियमित केली जात आहेत. बालाजीनगर, शिवशंकर कॉलनीतील एक प्रकरण सदस्य त्र्यंबक तुपे यांनी आज समोर आणले. नागरिक सहा-सहा महिने चकरा मारून थकतात, तरी त्यांना गुंठेवारीची संचिका पूर्ण करून मिळत नाही. काही संचिका एक दिवसात हातोहात मंजूर होतात. गुंठेवारी वसाहतींमध्ये पाच-पाच मजली इमारती झाल्या आहेत. शाळांच्या इमारतीही बांधल्या आहेत. अपार्टमेंट होत आहेत. ही कुणाची कृपा आहे, असे तुपे म्हणाले. गुंठेवारी कक्षप्रमुख आर. एन. संधा हे स्थायी समितीच्या बैठकीला नव्हते. पुढच्या बैठकीत चर्चा करण्याचे आदेश सभापती वाघचौरे यांनी दिले. अधिकाऱ्यांचे मत असे..प्रभारी सहायक संचालक नगररचना शिरीष रामटेके म्हणाले, गुंठेवारीतील १२ मीटर रोड किंवा डीपी रोडवरील घरे नियमित करताना मोजणी नकाशा महत्त्वाचा असतो.गुंठेवारीची संचिका जुन्या मालकी हक्काची असेल व लाईट बिल, खरेदीखताचा पुरावा असेल तर नियमित करताना त्याची पडताळणी केली जाते. सदस्य म्हणाले..सदस्य संजय चौधरी यांनी आरोप केला की, ४ वर्षांपासून चिकलठाणा वॉर्डातील ३०० संचिका गुंठेवारी विभागाने दाबून ठेवल्या आहेत. ‘डी. पी. रोडमुळे बाधित’ असे लिहून त्या संचिका पूर्ण केलेल्या नाहीत. प्रशासन गुंठेवारीतील नगरसेवकांना अस्पृश्य वागणूक देत आहेत. सुरेंद्र कुलकर्णी यांनी गुंठेवारी विभाग झोपेचे सोंग घेत असल्याचा आरोप केला.
गुंठेवारी वसाहतींतील घरे नियमित करण्यात दलालांची होतेय चलती
By admin | Updated: July 4, 2014 01:10 IST