उस्मानाबाद : सद्यस्थितीत गरजेपेक्षा अत्यंत कमी पाणीसाठा उपलब्ध असून, याचे समन्यायी वाटप होणे गरजेचे असे सांगतानाच मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळविण्यासाठी व समन्यायी पाणी वाटपासाठी लोकचळवळ उभी करून संघर्ष तीव्र करण्याची गरज मराठवाडा पाणी हक्क समितीच्या बैठकीत अनेकांनी बोलून दाखविली.तालुक्यातील उपळे (मा) येथे शनिवारी आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रगतशील शेतकरी पांडुरंग आवाड होते. यावेळी प्रमुख वक्ते जलतज्ज्ञ डॉ. प्रदीप पुरंदरे, अण्णासाहेब खंदारे, सुभेदार बन] डॉ. बाबासाहेब आंबेडकर साखर कारखान्याचे अध्यक्ष अरविंद गोरे, आदी उपस्थित होते. प्रारंभी संयोजन प्राचार्य डॉ. रमेश दापके यांनी बैठक आयोजनामागील उद्देश सांगितला. पाणी प्रश्न आणि समितीची भूमिका विषद करताना प्रा. डॉ. प्रदीप पुरंदरे म्हणाले, पाण्यासाठी संघर्ष करण्यापूर्वी त्याच्या विविध बाबींचा विचार करणे गरजेचे आहे. समन्यायी पाणी वाटप, जलसंधारण, पाणी वापर संस्था, धरणांचे मुल्यमापन आणि लोकचळवळ या अंगाने जावे लागेल. आज मराठवाड्यात केवळ २०९ टीएमसी पाणी उपलब्ध आहे. गोदावरी पाणी वाटप लवादाने पाणी दिलेल्या मान्यतेपेक्षा ९१ टक्के पाणी अडविले आहे. तरीही मराठवाड्यात पन्नास टक्के पाण्याची तूट आहे. त्यातच नगर, नाशिककरांनीही ८० टीएमसी अतिरिक्त पाणी अडविल्याने जायकवाडीत पाणी येणे कमी झाले आहे. तीच अवस्था कृष्णा मराठवाडा प्रकल्पाचीही आहे. कृष्णा खोऱ्यात मराठवाड्याच्या हक्काचे ६२ टीएमसी पाणी असताना केवळ २५ टीएमसी पाणी मंजूर केले. त्यातील सात टीएमसीची कामे सुरू केली. मात्र, पर्यावरणाचा परवाना घेतला नसल्यानेही तीही बंद पडल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात सर्व भागांना समन्यायी पाणी मिळावे यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधीकरण अधिनियम हा कायदा २००५ मध्ये केला. मात्र, त्याचे नियमन बनविले नसल्याने आज तो निरूपयोगी ठरत आहे, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे यापुढील काळात जनतेनेच आपल्या भागात पडणारे पावसाचे पाणी तेथेच अडवून जिरविले पाहिजे व शासनावर समन्यायी पाणी वाटपासाठी लोकचळवळीतून दबाव वाढविला पाहिजे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून संघर्ष निर्माण करण्यासाठी स्थानिक कार्यकर्ते व नेत्यांना जागृत करण्याचे आवाहनही पुरंदरे यांनी केले. अण्णासाहेब खंदारे यांनी उस्मानाबादला मिळणाऱ्या २५ टीएमसी पाण्यासाठी न्यायालयाद्वारे व वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून लढा देण्याची गरज असल्याचे सांगितले. अध्यक्षीय समारोपात पांडुरंग आवाड यांनी शेतकऱ्यांनी पाण्याचे नियोजन कसे करावे, याची माहिती दिली. अरविंद गोरे, अनंत आडसूळ, नेताजी गरड, बशारत अहमद, प्रा. अर्जुन जाधव, शिवाजी सरडे, शहाजी पाटील, प्रा. नितीन पाटील, कोंडाप्पा कोरे यांनीही यावेळी काही सूचना मांडल्या. प्रा. जाधव व मुख्याध्यापक गवाड यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
हक्काच्या पाण्यासाठीचा संघर्ष तीव्र करण्याची गरज
By admin | Updated: September 15, 2014 00:25 IST