नांदेड : जिल्ह्यात हत्तीरोगाचा प्रार्दुभाव वाढत असून त्यामुळे रुग्णसंख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे़ १६ ते ३१ आॅगस्ट दरम्यान केलेल्या हत्तीरोग रुग्णशोध मोहिमेनुसार जिल्ह्यात तब्बल ५ हजार ९०० रुग्ण आढळले होते़ त्यामध्ये गेल्या वर्षभरात आणखी वाढ झाल्याची दाट शक्यता आहे़जिल्ह्यातील काही निवडक तालुक्यात हत्तीरोगाचे मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत आहेत़ यात माहूर, किनवट, भोकर या तालुक्यांचाही समावेश आहे़ शासनाच्या आकडेवारीनुसार, अंडवृद्धीचे २१३४, हत्तीपायाचे ३७६९ असे एकुण ५ हजार ९०३ रुग्ण आढळले आहेत़ हत्तीरोगामुळे रुग्ण दगावत नसला तरी, शारीरिक विकृती व विद्रुपता येते़ त्यासाठी हत्तीरोगाचा कायमचा प्रार्दुभाव अणाऱ्या भागामध्ये २००४ पासून एकदिवसीय सामुदायिक औषधोपचार मोहिम घेण्यात येत आहे़ ज्यांच्या शरीरात मायक्रोपायलेरीयाचे जंतू असोत किंवा नसोत लक्षणे असोत किंवा नसोत अशा सर्व व्यक्तींना वर्षातून एकदा गोळीची एक मात्रा खाऊ घालण्यात येते़ या एकदिवसीय औषधोपचारामुळे रुग्णाच्या शरीरातील जवळपास ९५ टक्के जंतू मरतात़ त्यामुळे रोगाचा फैलाव होत नाही़ हत्तीरोगामध्ये अंडवृद्धी ही एक महत्वाची समस्या आहे़ अंडवृद्धी झालेल्या रुग्णांसाठी २० आॅगस्ट ते १७ सप्टेंबर दरम्यान ग्रामीण रुग्णालयांमध्ये शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे़ (प्रतिनिधी)
जिल्ह्यात हत्तीरोगाचे सहा हजार रुग्ण
By admin | Updated: August 18, 2014 00:33 IST