लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता सुमित राघवन याने औरंगाबादेतील संत एकनाथ रंगमंदिराच्या दुरवस्थेचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकून राज्यात एकच खळबळ उडवून दिली आहे. या व्हिडिओमुळे महापालिकेची राज्य पातळीवर नाचक्की होत आहे. त्यातच सोमवारी सकाळी महाराष्टÑ नवनिर्माण सेनेने ‘संत एकनाथ’च्या मुद्यावर महापालिकेसमोर जोरदार पताका आंदोलन केले. सायंकाळी आ. सतीश चव्हाण यांनी महापौर बापू घडमोडे यांना एक पत्र पाठवून नाट्यगृहाकडे त्वरित लक्ष देण्याची मागणी केली.संत एकनाथ रंगमंदिर महापालिकेसाठी पांढरा हत्ती ठरत आहे. यापूर्वी अनेकदा मनपाने नाट्यगृहाच्या खाजगीकरणाचा प्रयत्न केला. मात्र, नाट्यप्रेमींनी मनपाचा हा ‘प्रयोग’ उधळून लावला. त्यामुळे प्रशासन कसेबसे नाट्यगृह चालवित आहे. नाट्यगृहाची अवस्था अत्यंत दयनीय आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्यातच रविवारी अभिनेता सुमित राघवन याने संत एकनाथ रंगमंदिराच्या दुरवस्थेचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला. त्यामुळे राज्यभरात मनपाची नाचक्की सुरू झाली.सोमवारी सकाळी मनसेतर्फे मनपासमोर जोरदार पताका आंदोलन करण्यात आले. मनसेच्या शिष्टमंडळाने मनपाचे अतिरिक्त आयुक्त भालसिंग यांना निवेदनही सादर केले. यात मागील वर्षी अभिनेता प्रशांत दामले यांनी नाट्यगृहात झाडू मारून निषेध केला होता. त्यानंतरही मनपाने कोणतीही कारवाई केली नाही. येत्या दहा दिवसांत नाट्यगृहाची डागडुजी करावी, ३० दिवसांमध्ये सर्व मोठी कामे करावीत आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी जिल्हा सचिव संदीप कुलकर्णी, प्रवीण मोहिते, चेतन पाटील, निखिल ताकवाले, अरविंद शेलार, शुभम नवले, तुषार नरवडे, चंदू नवपुते, स्वप्नील घोडके, श्रीपाद पटवारी, सोहेल पठाण, प्रथमेश दुधगावकर, नयन करमारकर आदींची उपस्थिती होती.
रंगमंदिराचा वाद उफाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 00:31 IST