औरंगाबाद : कमी होतो आहे, म्हणता म्हणता पुन्हा एकदा कोरोनाच्या संकटाने डोके वर काढले आहे. पाचवीपासून पुढच्या इयत्तांच्या सुरू झालेल्या शाळाही बंद करण्याची वेळ आली. असे असताना दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार असे शिक्षण मंत्र्यांनी सांगितल्यामुळे पालकांची आणि विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. महाराष्ट्रातील काही शहरांची परिस्थिती चिंताजनक असून, तेथे काही दिवसांसाठी लॉकडाऊनही घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे अशा वातावरणात मुलांना शाळेत पाठविणे धोकादायक वाटत असले तरी,
परीक्षा सुरू होईपर्यंत परिस्थिती आटोक्यात येईल, अशी अपेक्षा पालक व्यक्त करत आहेत.
दहावी - बारावी या मुलांच्या करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या वळणावर कोरोनाचे जागतिक संकट ओढवल्याने पालक आधीच चिंताग्रस्त झाले आहेत. अशा परिस्थितीशी जुळवून घेत विद्यार्थी परीक्षेची तयारी करत आहेतच. फक्त सगळे पेपर विद्यार्थ्यांना सुखरूप देता यावेत, परीक्षा काळात कोरोनाचा संसर्ग होऊ नये, अशी प्रत्येक पालकाला काळजी वाटते आहे.
चौकट :
परीक्षेचे वेळापत्रक
दहावीची परीक्षा- २९ एप्रिल ते २० मे
बारावीची परीक्षा- २३ एप्रिल ते २१ मे
प्रतिकिया दहावीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांना काय वाटते
१. सध्या पुन्हा सुरू झालेला कोरोनाचा उद्रेक मुलांच्या परीक्षांपर्यंत कमी होईल, अशी आशा आहे. दहावी- बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच व्हायला पाहिजेत. फक्त सर्व केंद्रांवर विद्यार्थ्यांची योग्य काळजी घेतली जावी, हीच अपेक्षा आहे. याउलट विद्यार्थ्यांना आपल्या शाळेतल्या सगळ्या गोष्टी माहिती असतात. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला होम सेंटर देऊन आपापल्या शाळेतच परीक्षा देण्याची संधी मिळाली तर चांगले होईल.
- पल्लवी मालाणी
२. माझे पाल्य जर आता १० वी मध्ये नसते, तर अशा परिस्थितीत आम्ही यावर्षीची परीक्षा कधीच गांभीर्याने घेतली नसती. पण आता १० वीचे महत्त्वाचे वर्ष असल्याने आमचाही नाईलाज आहे. मुलांनी परीक्षा देण्यासाठी केंद्रावर जाणे गरजेचेच आहे. कारण दहावी व बारावीसारख्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या तर मुलांना आणि पालकांनाही त्याचे गांभीर्य राहणार नाही. त्यामुळे योग्य काळजी घेऊन परीक्षा घ्याव्यात.
- अमोल जगताप
प्रतिक्रिया
बारावीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांना काय वाटते
१. जेईई तसेच अन्य स्पर्धा परीक्षांसाठी आता विद्यार्थ्यांना सेंटरवर जावेच लागत आहे. त्यामुळे आता जशी काळजी घेऊन आम्ही विद्यार्थ्यांना सेंटरवर पाठवत आहोत, तसेच बोर्डाच्या परीक्षेसाठीही पाठवू. काळजी तर खूप वाटते, पण वर्ष महत्त्वाचे असल्याने पर्याय नाही.
- मंजुषा चौधरी
२. परीक्षेची वेळ येईपर्यंत कोरोना कमी होईल, अशी आशा वाटते. परिस्थिती याच्या उलटही होऊ शकते. जर त्या वेळी रुग्ण वाढत गेले, तर शासनाला विद्यार्थ्यांना उद्भवू शकणारा धोका लक्षात घेऊन त्यांचा निर्णय बदलावा लागू शकताे.
- तृप्ती पाटील