उस्मानाबाद : जिल्हा परिषदेअंतर्गतच्या विविध विषय समित्यांवरील रिक्त जागेवर नवीन सदस्यांच्या नियुक्तीसाठी मंगळवारी विशेष सर्वसाधारण सभा घेण्यात आली. अध्यक्ष अॅड. धीरज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत वेगवेगळ्या पाच समित्यांवर दहा सदस्यांची नव्याने वर्णी लागली आहे.जिल्हा परिषदेअंतर्गत स्थायी समिती, जलव्यवस्थापन समिती, शिक्षण समिती, बांधकाम समिती, पशुसंवर्धन व दुग्धविकास समिती आणि समाजकल्याण समितीवरील जवळपास दहा जागा रिक्त झाल्या होत्या. त्यांच्या नियुक्तीसाठी मंगळवारी विशेष सभा बोलावण्यात आली होताी. यावेळी उपाध्यक्ष सुधाकर गुंड, कृषी सभापती बाबुराव राठोड, बांधकाम सभापती दत्तात्रय मोहिते, समाजकल्याण सभापती हरिष डावरे आणि महिला व बालकल्याण सभापती लता पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये इच्छुक सदस्यांकडून अर्जांची स्वीकृती झाली. यामध्ये स्थायी समितीसाठी माजी अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे, जलव्यवस्थापन समितीसाठी धनश्री ढंगे, धनंजय सावंत, मनीषा हुंबे (दोन अर्ज), सुभाष व्हट्टे आणि संजय पाटील दुधगावकर यांनी अर्ज दाखल केले होते. तसेच शिक्षण समितीसाठी माजी कृषी सभापती पंडित जोकार यांचा एकमेव अर्ज आला होता. त्याचप्रमाणे बांधकाम समितीसाठी माजी उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, सविता सोनटक्के आणि सरस्वती पाटील यांनी अर्ज भरले होते. पशुसंवर्धन व दुग्ध विकास समितीसाठी माजी समाजकल्याण सभापती दगडु धावारे यांचा एकमेव अर्ज आला होता. त्याचप्रमाणे समाजकल्याण समितीसाठीही दगडू धावारे यांच्यासोबतच सविता कोरे यांनीही अर्ज भरला होता. दरम्यान, छाननी झाल्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले. यावेळी जलव्यवस्थापन समितीसाठी अर्ज दाखल केलेले डॉ. व्हट्टे, दुधगावकर आणि मनीषा हुंबे (१) यांनी निवडणूक आखाड्यातून माघार घेतली. तसेच बांधकाम समितीसाठी अर्ज दाखल केलेल्या सरस्वती पाटील यांनीही माघार घेतली. त्यामुळे दहा जागांसाठी दहाच अर्ज शिल्लक राहिल्याने अध्यक्ष अॅड. धीरज पाटील संबंधित सदस्यांची नावे जाहीर केली. यावेळी नवनिर्वाचित सदस्य, सभापतींचा विभाग प्रमुखांच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच अध्यक्ष धीरज पाटील यांच्या निवासस्थानीही सत्कार समारंभ पार पडला. (प्रतिनिधी)डॉ. सुभाष व्हट्टे (स्थायी समिती), धनश्री ढंगे, धनंजय सावंत, मनीषा हुंबे (जलव्यवस्थापन समिती), पंडीत जोकार (शिक्षण समिती), संजय पाटील दुधगावकर, सविता सोनटक्के (बांधकाम), दगडू धावारे (पशुसंवर्धन व दुग्ध विकास) आणि समाजकल्याण समिती सदस्य म्हणून दगडू धावारे, सविता कोरे यांची वर्णी लगली आहे.
विषय समित्यांवर दहा सदस्यांची वर्णी
By admin | Updated: November 12, 2014 00:25 IST