औरंगाबाद : केंद्र शासनाच्या भाषा विकास परिषदेतर्फे आयोजित ‘उर्दू किताब मेला’ शनिवारपासून ऐतिहासिक आमखास मैदानावर सुरू आहे. मागील तीन दिवसांमध्ये तब्बल दहा लाख रुपयांच्या पुस्तकांची विक्री झाल्याचे संयोजकांनी सांगितले.उर्दू भाषेला प्रोत्साहन मिळावे म्हणून केंद्र शासनातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. ‘उर्दू किताब मेला’आयोजित करण्यामागे उर्दू भाषेचा अधिक विकास व्हावा, जास्तीत जास्त नागरिकांनी उर्दूचे वाचन करावे हा उद्देश आहे.आमखास मैदानावर आयोजित मेळाव्यात फक्त उर्दू भाषेचीच पुस्तके नसून, हिंदी, मराठी, इंग्रजी आदी भाषांचीही पुस्तके उपलब्ध आहेत. सकाळी दहा ते रात्री दहापर्यंत पुस्तके खरेदीसाठी महिला, पुरुष, विद्यार्थी, विद्यार्थिनी, साहित्यिक, पुस्तकप्रेमी अलोट गर्दी करीत आहेत.मागील वर्षी केंद्र शासनाने उर्दू किताब मेला मालेगाव येथे आयोजित केला होता. ६५ स्टॉलवर नऊ दिवसांमध्ये १ कोटी रुपयांची पुस्तके विकल्या गेली होती. यंदा ऐतिहासिक औरंगाबाद शहरात सर्वाधिक १५६ स्टॉल लावण्यात आले आहेत. कोट्यवधी रुपयांची पुस्तके प्रकाशक आणि विक्रेत्यांनी आणली आहेत. मागील तीन दिवसांमध्ये दहा लाखांहून अधिक पुस्तकांची विक्री झाली. शेवटच्या दिवसापर्यंत हा आकडा किमान दीड ते दोन कोटींपर्यंत जाईल, असा अंदाज आहे.
दहा लाखांच्या पुस्तकांची विक्री!
By admin | Updated: December 30, 2014 01:19 IST