औरंगाबाद : परमेश्वरा कळत न कळत आमच्याकडून अनेक चुका होत आहेत; पण आमच्या चुकांची शिक्षा संपूर्ण सृष्टीला देऊ नको...आम्हाला माफ कर...तुला आमच्यावर दया येत नसेल तर किमान मुक्या जनावरांसाठी तर पाऊस दे...असे म्हणत आज हजारो नागरिकांनी अश्रूंचा बांध मोकळा केला.निमित्त होते, छावणी येथील ईदगाहमध्ये विशेष नमाजचे. शुक्रवारची नमाज झाल्यानंतर हजारो नागरिक पायी छावणी ईदगाहमध्ये दाखल झाले. पाऊस यावा म्हणून विशेष नमाज अदा करण्यात आली. त्यानंतर सर्वांनी मिळून ‘दुआ’ केली. पाण्यासाठी हजारो हात आकाशाकडे सरसावले. तब्बल २५ मिनिटे ही दुआ सुरू होती. यावेळी पेशइमाम हाफेज जाकेर साहब यांनी केलेली दुआ उपस्थित प्रत्येक भाविकाला रडण्यासाठी भाग पाडणारी ठरली.संयोजकांनी चार दिवसांपूर्वीच जाहीर केले होते की, ईदगाहमध्ये दुपारी ३ वाजता विशेष नमाज अदा करण्यात येणार आहे. शहराच्या वेगवेगळ्या भागांत राहणारे आबालवृद्ध ईदगाह मैदानावर पोहोचत होते. नागरिकांचा हा ओघ लक्षात घेऊन संयोजकांनी पाऊण तास उशिराने नमाज सुरू केली. अवघ्या एका तासात छावणी ईदगाह मैदानाला रमजान ईदसारखे स्वरूप प्राप्त झाले. अनेक नागरिकांनी नमाजसाठी पायी येणे पसंत केले. काहींनी तर मुकी जनावरेही आणली होती. अल्लाहला या मुक्या जनावरांवर तरी दया येईल, अशी यामागची संकल्पना आहे.सुरुवातीला मौलाना मनसब खान, हाफेज इकबाल अन्सारी, जामा मशीदचे प्रमुख मौलाना रियाजोद्दीन फारुकी, मोईजोद्दीन फारुकी, मौलाना मुजीब उल्ला यांनी मार्गदर्शन केले. सर्व धर्मगुरूंनी पाऊस न येण्यामागची कारणे विशद केली. प्रत्येकाने आपले आचरण चांगले ठेवले तर सृष्टीचा निर्माणकर्ता असा प्रकोप आणणारच नाही. निसर्गाच्या विरोधात माणूस जात असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.जामा मशीदचे पेशइमाम हाफेज जाकेर साहब यांनी पावसासाठी विशेष नमाज पढविली. त्यानंतर मौलाना मुफ्ती मोहसीन यांनी ‘खुदबा’पढविला. हाफेज जाकेर यांनी विशेष दुआ केली. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.महापालिकेचा निषेध छावणी ईदगाह येथे पाऊस यावा म्हणून विशेष नमाज आयोजित केली असल्याचे पत्र ईदगाह कमिटीने चार दिवसांपूर्वीच मनपाला दिले होते. नमाज सुरू होईपर्यंत महापालिकेने मैदानावर भाविकांना हात-पाय धुण्यासाठी पाण्याची सोय केली नव्हती. त्यामुळे हाफेज इकबाल अन्सारी यांनी महापालिकेचा जाहीरपणे निषेध केला. उपस्थित नागरिकांनी मनपा अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क साधला तरी पाण्याचा टँकर शेवटपर्यंत आलाच नाही.
पावसासाठी अश्रूंचा बांध फुटला!
By admin | Updated: July 19, 2014 01:21 IST