औरंगाबाद : मुलांना समजून घ्या. त्यांच्यामध्ये न्यूनगंड निर्माण होणार नाही, याची खबरदारी घ्या. आनंदी मनाने जेव्हा तुम्ही त्यांना शिकवाल, तेव्हा मुलं आपोआप शिकतील, असे मत राज्याचे शिक्षण सचिव नंदकुमार यांनी केंद्रप्रमुखांच्या विभागीय प्रेरणा कार्यशाळेत व्यक्त केले. जिल्हा परिषद, शिक्षण उपसंचालक आणि आंग्ल भाषा विभागाच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी मराठवाड्यातील केंद्रप्रमुखांसाठी प्रेरणा कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेत शिक्षण सचिव नंदकुमार यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, सर्व केंद्रप्रमुख सहभागी झाले होते. व्यासपीठावर शिक्षण संचालक डॉ. नांदेडे, शिक्षण उपसंचालक भाऊसाहेब तुपे, शिक्षणाधिकारी आर. एस. मोगल, उपशिक्षणाधिकारी एम. के. देशमुख आदींची उपस्थिती होती. यावेळी नंदकुमार म्हणाले की, मर्यादा किंवा बंधने मुलांवर लादू नका. त्यांना मुक्तपणे शिकू द्या. मुलांना शिक्षकांनी समजून घेतले पाहिजे. तुम्ही आनंदी राहा मग मुलं आनंदी राहतील. मुलांना एवढे शिकवा की आपणास आनंद मिळाला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये जवळपास ६० बोलीभाषा बोलल्या जातात. ज्याचा शिक्षणाचा कसलाही संबंध नाही, ते लोक या बोलीभाषा उत्तमपणे बोलतात. त्यामुळे आपण डी. एड., बी. एड. आहोत, हा गैरसमज मनातून काढून टाका. मुलांना समजून घ्या. त्यामुळे मुलांमध्ये शिकण्याची गोडी निर्माण होईल आणि ती प्रगत होतील.
शिक्षकांनी मुलांना समजून घ्यावे
By admin | Updated: July 10, 2016 01:09 IST