जालना : मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत मराठी विषय घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मराठी भाषा सोपी जावी यासाठी शासनाने मराठी फाउंडेशनची स्थापना केली आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्यांतील २० उर्दू माध्यमाच्या शाळेत २० शिक्षकांची नियुक्ती केली. परंतु गेल्या एक वर्षापासून मानसेवी शिक्षकांचे मानधन देण्यात आले नसल्याने मुस्लिम विद्यार्थ्यांचे मराठी शिक्षण वाऱ्यावर असल्याचे चित्र आहे. परिणामी घेण्यात येणाऱ्या विविध चाचणी परीक्षा सुद्धा बंद असल्याची माहिती आहे. मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांना मराठी भाषा शिकविण्यासाठी मे २००५ पासून शासनाने मराठी भाषा फाउंडेशन सुरू केले आहे. विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षा देताना मराठी भाषा अवघड ठरू नये,असा या मागील उद्देश आहे. २० शाळांमध्ये मराठी भाषा फाउंडेशनची सुरू करण्यात आले आहेत. वर्षभरापासून शिक्षकांना देण्यात येणारे पाच हजार रूपये मानधन मिळाले नसल्याने या उद्देशाला हारताळ फासला जात आहे. मानधनच मिळत नसल्याने मानसेवी शिक्षकही हैराण आहेत.माधनन नसल्याने मराठी शिकविण्याकडे दुर्लक्ष होत आहे. गेल्या शैक्षणिक वर्षापासून माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या अखत्यारित असलेली ही योजना आता निरंतर शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्याकडे देण्यात आली आहे. पूर्वी मानसेवी शिक्षकांचे मानधन जिल्हाधिकारी यांच्या अखत्यारित होते. ते आता प्रौढ शिक्षण संचालनालय पुणे यांच्या अखत्यारित येवूनही शिक्षकांच्या मानधनाकडे दुर्लक्ष होत असल्याने दर तीन महिन्याला होणारी तीमाही परीक्षा रखडल्या आहेत. उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मराठी शिक्षणाकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)
शिक्षकांचे मानधन रखडले..!
By admin | Updated: January 25, 2017 00:47 IST